धक्कादायक ! फवारणी करताना शेतकऱ्याला विषबाधा, उपचारादरम्यान मृत्यू

धरणगाव : शेतात फवारणी करताना भाऊसाहेब मधुकर जाधव (रा. पष्टाने ता. धरणगाव) यांना विषबाधा झाली.  जिल्हा शायकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान ११ रोजी रात्री ८ वाजता त्यांचा मृत्यू झाला.  या प्रकरणी धरणगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

भाऊसाहेब मधुकर जाधव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. मंगळवार, ११ जून रोजी दुपारी ते दिवसभर शेतात फवारणीचे काम करत होते. त्यावेळी त्यांना विषबाधा झाल्याने तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री ८ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पवार हे करीत आहे.