तरुण भारत लाईव्ह । २९ सप्टेंबर २०२३। छत्रपती संभाजीनगर येथे एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका आईने पोटच्या मुलीला मैत्रिणीच्या सांगण्यावरून पैशांच्या लोभापायी जिवंत जळण्याचा प्रयत्न केला. जाळल्यानंतरही तिचा मृत्यू न झाल्याने तिला घरातच ५ दिवस डांबून ठेवले. या प्रकरणावरून आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, १७ ऑगस्ट रोजी ती एका खासगी कंपनीत काम करून घरी परतून झोपली असताना मध्यरात्रीच्या वेळी तिच्या आईने अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड केल्यावर भावाने धाव घेऊन आग विझवली. या घटनेमध्ये ती गंभीररीत्या जखमी झाली आहे. सुप्रिया दादासाहेब हलमुख वय २० असं पीडित तरूणीचे नाव असून ती आपली आई पार्वती हलमुख वय ४० हिच्यासोबत शहरातील फुलेनगर परिसरात राहते. सुप्रियाच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले असल्याने ती आपल्या आई आणि भावासोबत राहते.
पार्वतीने आपली मैत्रीण शकुंतला आहेर हिच्या सांगण्यावरून हे कृत्य केले अशी माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली. शकुंतला ही जादूटोणा करून अनेकांना फसवण्याचे प्रकार करते. “तू जर तुझ्या मुलीला जिवंत जाळून मारले तर तुला चांगला धनलाभ होईल आणि तुझ्या मुलाचेसुद्धा चांगले होईल” असं शकुंतला हिने पार्वतीला सांगितले होते. सुदैवाने मुलगी वाचली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.