अभिनेत्री मलायका आरोरा हिच्या वडिलांनी इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, आत्महत्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मुंबईच्या वांद्रे येथील अल्मेडा पार्कमध्ये आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
या घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, प्राथमिक चौकशीला सुरूवात केली आहे. अनिल अरोरा यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
अनिल अरोरा हे मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होते. निवृत्तीनंतर ते मुंबईतील वांद्रे येथे राहत होते. गेल्या वर्षी वैद्यकीय समस्येमुळे त्यांना उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी आई जॉइससह मलायकाही रुग्णालयात दिसली होती. मात्र, त्यांना नक्की काय आजार झाला होता ते समोर आले नव्हते.
मलायका अरोरा पुण्याहून मुंबईसाठी रवाना…
अभिनेत्री मलायका अरोरा काही कामानिमित्ताने पुण्यात होती. या घटनेची माहिती मिळताच मलायका तातडीने मुंबईसाठी रवाना झाली. या घटनेची माहिती मिळताच अरोरा कुटुंबातील सदस्यांना धीर देण्यासाठी मलायकाचा पूर्व पती आणि अभिनेता अरबाज खान हा अरोरा यांच्या घरी दाखल झालाय.