नवापूर : वडखुट येथे खंडित विज पुरवठा सुरळीत करताना विजेचा शॉकलागून लाईनमनचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. अनिल फत्तेसिंग गावीत रा.नागझिरी ता.नवापूर असे मयत लाईनमनचे नाव आहे. या घटनेने एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील वडखुट येथील वांत्या आवश्या गावीत यांच्या शेतात असलेल्या १६ के.व्ही.विज पोलवर गेल्या दोन दिवसा पासून काही तांत्रिक बिघाड झाल्याने विज पुरवठा खंडित झाला होता. रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास विज वितरण कंपनीचे लाईनमन अनिल फत्तेसिंग गावीत रा.नागझिरी ता.नवापूर हे विज पोलवर चढुन विज दुरुस्ती काम करत असताना अचानक विज पुरवठा सुरू झाल्याने लाईनमन अनिल गावीत यांना विजेचा जोरात शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सदरची वार्ता वार्या सारखी गावात पसरताच बघ्यांची गर्दी झाली. याबाबत विसरवाडी पोलिस ठाण्यात खबर मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उप.निरिक्षक भुषण बैसाणे, पो.कॉ.अनिल राठोड, अतुल पानपाटील यांनी धाव घेतली, घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.