धनत्रयोदशीपूर्वी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण ; पहा काय आहे नवीन दर?

मुंबई । उद्या १० नोव्हेंबर धनत्रयोदशीपासून देशभरात दिवाळी सणाला सुरुवात होणार असून अशा स्थितीत सोने आणि चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमीचा आहे. आज पुन्हा सोने आणि चांदीत मोठी घसरण झाली आहे. भारतीय संस्कृतीत लोक धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानतात. अशा स्थितीत सोने-चांदी स्वस्त होणे ही सर्वांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) या आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात घसरण सुरू आहे. सोमवारी सोन्याच्या दरात 50 रुपयांनी, मंगळवारी 250 रुपयांनी आणि बुधवारी 150 रुपयांची घट झाली आहे. तीन दिवसांत सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 450 रुपयांची घसरण झाली आहे. याशिवाय या आठवड्यात चांदी 1600 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

MCX वर आज सलग चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली. आज गुरुवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याचा दर 121 रुपयांनी घसरून 59,888 रुपये प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदीचा दर 708 रुपयांनी घसरून 70,342 रुपये प्रति किलोने व्यवहार करत आहे.

जळगावमधील सोने चांदीचा दर

जळगाव सराफ बाजारात सध्या 22 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 55,750 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,200 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर चांदीचा भाव 71,300 रुपये प्रति किलोपर्यंत घसरला.