जळगाव | धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळ कापूस व्यापाऱ्याची कार अडवून दीड कोटीची रकम लुटल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. दरम्यान, जळगाव एलसीबीच्या पथकाने या गुन्ह्याचा पडदा फाश केला असून कट रचणाऱ्या दोन संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अनिल उर्फ बंडू भानुदास कोळी (वय ३२) आणि दर्शन भगवान सोनवणे (वय २९ दोन्ही रा. विदगाव ता.जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे असून त्यांच्याकडून ४८ लाख रुपये हस्तगत केले आहे. गुन्ह्यातील ४ संशयीत अद्याप फरार असून पोलीस त्यांच्या मागावर असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नेमका काय होता प्रकार?
धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील दुर्गेश इम्पेक्स जिनींगमधून शेतकऱ्यांना देण्यासाठी १ कोटी ६० लाख रुपये घेवून तीन कर्मचारी कारने जळगावहून धरणगाव जात होते. दुपारच्या सुमारास मुसळी फाट्याजवळ त्यांच्या कारला समोरुन येणाऱ्या कारने धडक दिली. अपघातानंतर लागलीच चौघांनी चालकाच्या डोळ्यात मिरची पुड टाकली आणि लोखंडी रॉडने मारहाण करीत त्यांच्याकडील १ कोटी ६० लाखांची रोकड घेवून चोरटे तेथून पळ काढला. भरदिवसा जिनिंगची रोकड लुटल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुप्त माहिती आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अनिल उर्फ बंडा कोळी रा.विदगाव याचे नाव समोर आले होते. अनिल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी देखील ५ गुन्हे दाखल असल्याने पथकाने त्याचा शोध घेत मुसक्या आवळल्या. चौकशी केली असता अनिल उर्फ बंडा कोळी याने आपल्या साथीदारांसोबत महिनाभर जिनिंगमधील कर्मचारी व मालकांच्या हालचालीची रेकी केली. यामध्ये ते कुठल्या दिवशी बँकेत येतात, कधी आणि किती कॅश कोणत्या रस्त्याने घेवून जातात, ही संपुर्ण माहिती गोळा केल्यानंतर अनिल याने दरोड्याचा प्लॅन रचला होता.
एका गुन्ह्यात जिल्हा कारागृहात असतांना त्याची ओळख घरफोडीमधील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारासोबत झाली होती. त्याला भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांशी बंडा याची ओळख झाली होती. बंडा हा जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याने उल्हासनगर येथील दरोडा टोळीशी संपर्क प्लॅन अंमलात आणला. दोघांना सोमवारी धरणगाव येथे न्या.सूर्यवंशी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना पुढील तपासाकामी दि.२२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.