जळगाव : धावत्या बसचे एक चाक अचानक निखळले आणि त्यानंतर काही क्षणातच दुसऱ्या चाकाचे टायर फुटले. बसचालकाच्या समयसूचकतेमुळे बसमधील जवळपास ७७ प्रवासी सुखरूप बचावले आहेत. ही थरारक घटना कजगाव (ता. भडगाव) नजीक बुधवार, ७ रोजी सकाळी ११:४५ वाजेच्या सुमारास घडली.
मलकापूरहून विठ्ठलवाडीकडे जाणारी एस. टी. बस (क्र. एम.एच. २० बी.एल. ३२९६) बुधवारी पावणेबारा वाजेच्या सुमारास कजगाव-भडगाव मार्गावरील साईबाबा मंदिराजवळ पोहोचली. यावेळी बसमध्ये ७७ प्रवासी होते. अचानक धावत्या बसचे मागील एक चाक निखळून पडले आणि यानंतर काही क्षणातच दुसऱ्या चाकाचे टायर फुटले. त्यावेळी झालेल्या आवाजाने प्रवासी दचकले आणि आपल्याच बसचे टायर फुटल्याचे समजताच सर्व जण घाबरले. या अपघातामुळे बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस एकाच बाजूला ओढली जाऊ लागली.
चालकाने समयसूचकता दाखवत मोठ्या धाडसाने बसवर नियंत्रण मिळवत बसला खड्ड्यात पडण्यापासून वाचवले. बस थांबताच काही प्रवाशांनी बसमधून पटापट उड्या मारल्या. त्यावेळी समोरच असलेल्या साईबाबा मंदिर आणि दत्त मंदिराकडे प्रवाशांनी धाव घेत देवाचे आणि बसचालकाचे आभार मानले.