धावत्या रेल्वे वॅगनमधून चोरट्यांनी 48 हजारांचा कोळसा लांबवला

भुसावळ : दीपनगर विद्युत निर्मिती प्रकल्पाला कोळसा पुरवणार्‍या धावत्या रेल्वे वॅगनमधून तब्बल 48 हजार 480 रुपये किंमतीचा कोळसा मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास लांबवण्यात आला. सुरक्षा यंत्रणांनी हटकताच आरोपींनी कोळशासह पळ काढला.

अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 210 प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता विशाल रामचंद्र जोनवाल (40, दीपनगर) यांच्या तक्रारीनुसार, मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास गोंदिया कॅबीनकडून दीपनगर प्रकल्पाकडे येणार्‍या यार्डमध्ये धावत्या रेल्वे वॅगनमधून अज्ञात चोरट्यांनी 48 हजार 480 रुपये किंमतीचा व 24 टन वजनाचा कोळसा लांबवला. रेल्वेतून कोळसा फेकताना मोठ्या प्रमाणावर तो खाली पडल्याने नुकसानही झाले तर सुरक्षा यंत्रणांनी धाव घेता संशयित मात्र पसार झाले. भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय श्यामकुमार मोरे करीत आहेत.