धुळे जिल्ह्यात खळबळ : दरोडा, दागिन्यांची लूट, २३ वर्षीय युवतीचे अपहरण

धुळे : दरोडेखोरांनी चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून दागिन्यांसह २३ वर्षीय युवतीला पळवून नेल्याची खळबळजनक घटना साक्री शहरातील सरस्वती नगरात शनिवारी रात्री साडेदहा ते ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रविवारी (दि. २६) सकाळी ६ वाजता दरोडेखोरांविधात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, दरोडेखोरांनी ऐवजासह तरुणीलाही पळवून नेल्याची घटना जिल्ह्यात पहिल्यांदाच घडल्याने खळबळ उडाली आहे.

साक्री शहरातील सरस्वती नगरात राहणारे नीलेश प्रकाश पाटील हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. घरात त्यांची पत्नी होत्या, त्यादरम्यान ही घटना घडली. काळे कपडे परिधान केलेल्या एका दरोडेखोराने दार ठोठावत, घरात प्रवेश केला. त्यापाठोपाठ चार दरोडेखोर घरात आले.

दरोडेखोर हिंदी भाषा बोलत होते. घरात येताच चाकूचा धाक दाखवित त्यांनी दागिने कुठे आहेत, असे महिलेला विचारले. त्यांनी तिजोरीतून ८८ हजार ५०० रुपयांचे दागिने काढून घेतले. त्यानंतर २३ वर्षीय युवतीलाही कारमध्ये डांबले आणि तिला घेऊन पसार झाले.

दरोडेखोरांनी अपहरण केलेली युवती धुळे पोलिसांच्या एका पथकाला रात्री उशिरा मध्य प्रदेशातील सेंधवा येथे आढळून आली. पोलिसांनी मोबाइलच्या आधारे आरोपींचा पाठलाग सुरू केला होता. त्या दृष्टीने पोलिसांचे पथक मध्य प्रदेशात रवाना झाले होते. त्यातच संबंधित युवती मिळवून आल्याने तपास पथकाला दिलासा मिळाला आहे.