धुळे तालुका भाजपतर्फे खासदार बॅनर्जी, राहुल गांधींचा निषेध

धुळे, ता. २१ : संसद भवनाच्या बाहेर आंदोलन करताना विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती तथा देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या शारीरिक व्यंगाची नक्कल केली. या सर्व प्रकाराचे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी व्हीडीओ चित्रीकरण करत निर्लज्जपणाचा कळस गाठला. या समाजमन व्यथित करणाऱ्या घटनेचा भारतीय जनता पक्षाच्या धुळे तालुका शाखेतर्फे आज तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी भाजपच्या तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार कल्याण बॅनर्जी व खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिमांना जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली.

या संदर्भात निवेदनही देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की लोकसभेच्या कामकाजावेळी अनावश्यक गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांतील खासदारांचे निलंबन करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून संसद भवनाबाहेर आंदोलन सुरू होते. तेथे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या शारीरिक व्यंगाची नक्कल करत त्यांच्या शैलीत काही वाक्येही उच्चारली. हा हीन प्रकार थांबविण्याऐवजी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सर्व मानमर्यादा पायदळी तुडवत, हीन दर्जाच्या मानसिकतेचे दर्शन घडवत खासदार बॅनर्जी यांच्या नकलेचे व्हीडीओ चित्रीकरण केले. यामुळे देशाच्या संविधानिक पदावरील व्यक्तीचाच नव्हे, तर या पदाचाही विरोधी पक्षांच्या खासदारांनी अवमान केला आहे. याचा जितका निषेध होईल तो कमीच आहे. जनाधार गमावलेल्या काँग्रेससह विरोधी इंडिया आघाडीकडून असे हीन राजकारण केले जात आहे. याचा भारतीय जनता पक्षाच्या धुळे तालुका शाखेतर्फे तीव्र निषेध करण्यात येत असल्याचेही याबाबत भाजपच्या तालुका शाखेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या येथील पारोळा रोडवरील संपर्क कार्यालयाजवळ भाजपचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष रितेश परदेशी, किशोर सिंघवी, भाजपच्या उद्योग आघाडीचे सहसंयोजक उत्कर्ष पाटील, धुळ्याचे नगरसेवक नागसेन बोरसे, सरचिटणीस शरद पाटील, जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे, बोधगावचे सरपंच अविनाश पाटील, सखाराम पाटील, छोटू मासुळे, पवन कोळी, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, प्रमित शिंदे, सागर पाकळे, भूषण शिंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.