धुळे : भरधाव वेगातील एक कंटेनर हॉटेलमध्ये घुसल्याने जवळपास १३ जण ठार झाल्याची भयावह घटना धुळे जिल्ह्यातील मुंबई – आग्रा महामार्गावर घडली आहे. या अपघातात जवळपास १५ ते २० जण जखमी झालेत. त्यापैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे भरधाव वेगातील एक कंटेनर थेट हॉटेलमध्ये शिरला. त्यात १३ जणांचा चिरडून मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर हे गाव मध्य प्रदेशच्या सीमेवर येतं. याच गावाजवळ साधारणतः दुपारी १२ वाजताच्या दरम्यान ही अपघाताची घटना घडली. एक कंटेनर महामार्गावरुन जात असताना त्याचा ब्रेक फेल झाला आणि तो थेट हॉटेलमध्ये शिरला. या भीषण अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ ते २० जण जखमी झाले आहेत. सध्या अपघातस्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर सातपुडा पर्वत रागांच्या जवळ असलेल्या भागात मोठा उतार आहे. या उतारावर मध्य प्रदेशातून महाराष्ट्राच्या दिशेने येणार्या या कंटेनरचे ब्रेक फेल झाले होते. त्यानंतर हा कंटेनर थेट पळासनेर गावाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये घुसला. या कंटेनरने अन्य काही काही वाहनांनाही धडक दिल्याचे वृत्त आहे.