धुळे : सॅनिटरी पॅडआत दारूची वाहतूक करणार्या वाहनातून तब्बल 18 लाखांचा मद्यसाठा धुळ्यात जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गुजरात राज्यात प्रतिबंधीत असलेली मात्र गोवा निर्मित दारू ट्रकमधून नेली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुरुवारी मिळाल्यानंतर पथकाने अवधान फाटा येथे सापळा रचला. आर्वीकडून धुळ्याकडे येत असलेला आयशर ट्रक (यु.पी.80 एफ.टी.. 9398) आल्यानंतर चालकाने त्यात सॅनिटरी नॅपकीन असल्याची माहिती देत पावतीही सादर केली मात्र पथकाला संशय असल्याने पथकाने वाहन तपासले असता त्यात दारूचे खोके आढळले.
दोघांना अटक
या प्रकरणी ट्रक वरील चालक अर्जुन रामजीत बिंद (24ख रा.शेखाहीख पो.अधनपुर, ता.शाहगंज, जि.जौनपुर, उत्तरप्रदेश) व क्लिनर सोमनाथ नाना कोळी (26, खामखेडा, ता.शिरपूर) यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी गोवा निर्मित दारू गुजरातमध्ये नेत असल्याची कबुली दिली आहे.
18 लाखांचा मुद्देमाल जप्त
ट्रकच्या पाठीमागील बाजुला सॅनटरी पॅडच्या गोण्या भरल्याचे व समोरील बाजुस दारू व बिअरचे बॉक्स मिळून आले. सात लाख 81 हजार 800 रुपये किंमतीची देशी/विदेशी विविध कंपन्यांची विस्कीचे एकूण 205 खोके जप्त करण्यात आले असून त्यातील सहा हजार 804 दारूच्या बाटल्या, 40 हजार 800 रुपयांची ट्यूबर्ग कंपनीची बिअर व त्याच्या त 840 बाटल्या, 10 लाखांचा आयशर ट्रक, 12 हजारांचे सॅनिटरी पॅडच्या पांढर्या रंगाच्या 120 गोण्या व 10 हजारांचे दोन मोबाईल असा एकूण 18 लाख 44 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघा आरोपींविरूध्द मोहाडीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, बाळासाहेब सुर्यवंशी, संजय पाटील, संतोष हिरे, पोना पंकज खैरमोडे, पोलीस शिपाई महेंद्र सपकाळ, योगेश जगताप, किशोर पाटील यांच्या पथकाने केली.