धुळे : शिंदखेडा तालुक्यातील चिरणे गावात एकाच रात्रीत चार ठिकाणी चोरट्यांनी हातसफाई केली. चोरट्यांनी चार ठिकाणांहून अडीच लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी शिंदखेडा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
चिरणे येथील शेतकरी तुकाराम काळू चौधरी हे वृद्ध शेतकरी सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घराबाहेर आले असता, त्यांच्या जुन्या घराचा दरवाजा उघडा आणि दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले.
चोरट्याने कपाटातून १ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांसह एकूण पावणे दोन लाखाचा ऐवज चोरून नेला. गावातील चौधरी गल्लीतील रमेश गोविंदा चौधरी यांच्या घरातील कपाटातून २० हजार रुपये किमतीचे दागिने व पैसे चोरून नेले. नंतर सखाराम काळू चौधरी यांच्या घरातून मात्र चोरट्यांचा हाती काहीच लागले नाही.
पुढे चोरट्यांनी विठ्ठल गोविंदा चौधरी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून दहा हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.
चोरलेला ऐवज घेऊन शेवटी गावातील सुभाष दिगंबर नगराळे यांच्या मालकीची १२ हजार रुपये किमतीची एमएच १८-सीए १२४० क्रमांकाची दुचाकी चोरी करुन त्यावर ते पसार झाले. याप्रकरणी शिंदखेडा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.