धुळे : शहरातील देवपूर भागातील विद्या भवन लेडीज हॉस्टेलमधील 23वर्षीय विद्यार्थिनी तरुणीने मंगळवारी सकाळी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट नसलेतरी तणावातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. भारती अमृत चौरे (23) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. भारती ही साक्री तालुक्यातील दातर्ती गावची रहिवासी असून धुळ्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजच्या एलएलबीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. विद्यार्थिनीच्या आत्महत्येने हॉस्टेलमधील विद्यार्थिनींमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी देवपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तणावातून आत्महत्या केल्याचा अंदाज
एलएलबीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या भारतीने दोन महिन्यापूर्वीच हॉस्टेलला प्रवेश घेतला व सोमवारीच ती गावावरून हॉस्टेलमध्ये परतली होती मात्र रूममधील रूममेट गावाला गेल्यानंतर भारती रूममध्ये एकटी असताना मंगळवारी सकाळी तिने पंख्याला गळफास घेतला. दुपारी भारतीला बोलावण्यासाठी आल्यानंतर मैत्रीण आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. देवपूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर रूमचा दरवाजा तोडण्यात आल्यानंतर भारतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला तर मृत्यूपूर्वी तरुणीने सुसाईट नोट लिहिली असून त्यात ‘आई पप्पा सॉरी’ म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.