धोनी आज मैदानात उतरताच आयपीएलमध्ये इतिहास रचणार

चेन्नई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने येणार असून हे दोन्ही संघ यंदाच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मनाले जात आहेत. राजस्थान विरुद्धचा सामना चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी यासाठी मोठा असणार आहे. कारण धोनी चेन्नईचा कर्णधार म्हणून आज २०० वा सामना खेळणार आहे. हा एक मोठा रेकॉर्ड असणार आहे. धोनी पहिला खेळाडू असणार आहे, की जो आयपीएलच्या इतिहासात एकाच संघाचा कर्णधार म्हणून २००वा सामना खेळणार आहे. धोनीनंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा नंबर लागतो. त्याने मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून एकूण १४६ सामने खेळले आहे.

चेन्नई विरुद्ध राजस्थानचा हा सामना चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या मैदानाची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल मानली जाते. सामना जसजसा पुढे जातो, तसतशी फलंदाजी करणे अवघड होते. चेन्नईकडे रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर आणि मोईन अली यांसारखे, तर राजस्थानकडे रविचंद्रन अश्विन आणि यजुवेंद्र चहल यांसारखे दर्जेदार फिरकीपटू आहेत.

दरम्यान, प्रत्येकी दोन अर्धशतकी खेळी करणारे राजस्थान रॉयल्सचे सलामीवीर जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांची चेन्नई सुपरकिंग्सचा बालेकिल्ला असलेल्या चेपॉक मैदानावर त्यांच्या फिरकी गोलंदाजांविरुद्ध कठोर परीक्षा असेल. चेन्नईची खेळपट्टी फिरकीला पूरक मानली जाते. नाणेफेक निर्णायक ठरेल.