धोनी निवृत्त झाल्यानंतर रोहितने चेन्नईचे नेतृत्व करावे; कुणी व्यक्त केली इच्छा ?

आयपीएलचा आगामी हंगाम २२ मार्चपासून खेळवला जाणार आहे. यावेळी सर्वांच्या नजरा भारताच्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंवर असतील. पहिले नाव रोहित शर्माचे आहे, जो यावेळी फलंदाज म्हणून मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. तर, दुसरे नाव एमएस धोनीचे आहे, ज्याचा शेवटचा सीझन असू शकतो. दरम्यान, रोहित शर्मा आणि एमएस धोनीबाबत माजी भारतीय फलंदाज अंबाती रायडूने केलेल्या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

रोहित शर्माला २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जमध्ये जाताना बघायला आवडेल असे अंबाती रायडूने सांगितले. एवढेच नाही तर धोनी निवृत्त झाल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने CSK चे नेतृत्व करावे अशी त्याची इच्छा आहे. रोहित शर्मा 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार नाही. पाच वेळच्या चॅम्पियन्सने हार्दिक पांड्याला फ्रँचायझीचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.

रायुडूने न्यूज 24 ला सांगितले की, “रोहित आणखी 5-6 वर्षे खेळू शकतो. मला त्याला भविष्यात CSK कडून खेळताना बघायचे आहे. जर त्याला कर्णधार करायचे असेल तर तो जगात कुठेही करू शकतो. त्याने 2025 पर्यंत खेळावे अशी माझी इच्छा आहे. “मला त्याला सीएसकेकडून खेळताना पाहायचे आहे आणि जेव्हा एमएस निवृत्त होईल तेव्हा तो कर्णधारपदही स्वीकारू शकेल.”

गुजरात टायटन्स आणि एमआयच्या विरोधाभासी सेटअपमुळे मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणे हार्दिक पांड्यासाठी आव्हानात्मक असल्याचे रायडूने सांगितले. 243 सामन्यांत 6211 धावा करत रोहित आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या चौथ्या क्रमांकावर आहे.