नंदुरबार : तळोदा तालुक्यातील रांझणीसह प्रतापपूर, चिनोदा, बोरद, सोमावल तालुक्यात बिबट्यांची संख्या चांगलीच वाढली असून, सर्वत्र कुठे ना कुठे बिबटे दिसून येत असल्याने त्यांचे हल्ले सुरूच आहेत. त्यामुळे ग्रामस्थ चांगले धास्तावले असून, वनविभागाने खास उपाययोजना करून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
ग्रामीण भागात सायंकाळपासूनच तळोदा शहराकडे जाणारे रस्ते तसेच कोठार, धडगाव रस्ता निर्मनुष्य होत असून, बहुतांश युवक वर्ग तळोदा येथे कामाला जात असल्याने ते सायंकाळी लवकरच आपल्या घराकडे परत येण्यास प्राधान्य देत आहेत. तसेच रात्री घरीच वेळ काढत आहेत. ज्येष्ठ, लहान बालकेही संध्याकाळ पासूनच बाहेर दिसून येत नसल्याने सर्वत्र सायंकाळपासून लॉकडाऊन सदृश परिस्थिती असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सध्या गणेशोत्सव सुरू असून, रात्रीच्या वेळेस काही तरुणांकडून ढोल-ताशे वाजविण्यात येत असल्याने ग्रामस्थांना काहीसा धीर मिळत आहे. ह्या आवाजामुळे बिबटे गावामध्ये येऊ शकणार नसल्याचे सांगण्यात येत असून, गणेशोत्सव नंतर काय हा प्रश्न आतापासून त्यांच्या पुढे उभा ठाकत आहे.
सध्या शेती शिवारात निंदणी, खते देणे, फवारणी, मिरची तोडणी यासारखी कामे सुरू असून ऊस, केळी, पपई यासारखी मोठी पिके असलेल्या शेताच्या आजूबाजूच्या शेतांमध्ये मजूर रोजगारासाठी जाण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र आहे.