नंदुरबारच्या दोन विद्यार्थिनींची आंतरराष्ट्रीय फ्लोअरबॉल स्पर्धेसाठी निवड

नंदुरबार : आंतरराष्ट्रीय फ्लोअरबॉल संघटनेच्यावतीने जागतिक स्तरावर युरोपातील फिनलँड या देशात दि.८ ते १४ मे २०२४ दरम्यान होत असलेल्या आंतरराष्ट्रीय फ्लोअरबॉल स्पर्धेकरिता भारतातील दहा खेळाडूंची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत नंदुरबार जिल्हा फ्लोअरबॉल संघटनेच्या खेळाडू राजश्री राठोड (यशवंत कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार) व कन्या मराठे (श्रीमती ही.गो.हायस्कूल, नंदुरबार) यांची नुकतीच निवड झाली आहे.

या दोन्ही खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देण्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत महाराष्ट्र फ्लोअरबॉल संघाला यश प्राप्त करून दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या उत्कृष्ट खेळाच्या प्रदर्शनामुळे राजश्री राठोड व कन्या मराठे या दोन्ही खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी रोहतक हरियाणा येथे घेण्यात आलेल्या शिबिरातून भारतीय संघात निवड झाली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातून युरोपीय देशांमध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविणार्‍या या पहिल्या खेळाडू ठरल्या आहेत. नंदुरबार सारख्या अतीदुर्गम भागातील खेळाडू जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र फ्लोअरबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ.शिंदे, महाराष्ट्र सचिव रवींद्र चोथवे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष ऍड.राम रघुवंशी, कार्याध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी, सचिव जितेंद्र माळी, श्रीराम मोडक, राजेश शहा, डॉ.मयूर ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. निवड झालेल्या खेळाडूंना भरत चौधरी, मनीष सनेर यांचे मार्गदर्शन लाभले.