नंदुरबारच्या हिरणवाळे परिवारातर्फे परराज्यात मतदान जनजागृती अभियान

नंदुरबार : लोकशाहीचा उत्सव म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रशासनासह सर्वजण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. नंदुरबार येथील हिरणवाळे परिवारातर्फे अनोख्या पद्धतीने पर्यटनानिमित्त नंदुरबारसह कर्नाटक राज्यातील तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन मतदान जनजागृतीचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नंदुरबार येथील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांच्या नेतृत्वा खाली कुटुंबाची कुलदेवी कर्नाटक राज्यातील हुबळी व धारवाड रस्त्यावरील सौंदत्ती येथील यल्लमादेवी अर्थात रेणुका माता यांच्या दर्शनासाठी सहपरिवार गेले होते.

धार्मिक स्थळ आणि पर्यटनानिमित्त हिरणवाळे परिवारातर्फे ठिकठिकाणी भेटणाऱ्या असंख्य भाविकांना मतदान जनजागृतीचे हस्तपत्रके वाटण्यात आली. तसेच आगामी लोकसभा निवडणूकीनिमित्त होणाऱ्या मतदानादिवशी मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. नंदुरबारहुन मालेगाव जवळील ज्योतिबाचा यात्रौत्सव, शिर्डी साईबाबा मंदिर,अष्टविनायकपैकी सिद्धटेक येथील गणपती मंदिर, पंढरपूर विठ्ठल रखुमाई मंदिर आणि गवळी समाज , सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरचा मोठा महादेव मंदिर, कर्नाटक राज्यातील गुरुदत्ताचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गाणगापूर, हिरणवाळे परिवाराची कुलदेवी कर्नाटक राज्यातील हुबळी धारवाड रस्त्यावरील सौंदत्ती येथील यल्लमादेवी, सोलापूर गवळी समाज, तुळजापूर भवानी मंदिर, अक्कलकोट येथील श्री राजेराय मठाचे श्री स्वामी समर्थ मंदिर, संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिर, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले घृष्णेश्वर महादेव मंदिर, चाळीसगाव येथील बाल ब्रह्मचारी परमपूज्य सिदाजी आप्पा देवर्षी मंदिर आदी ठिकाणी हिरणवाळे परिवारातर्फे मतदान जनजागृती करण्यात आली.