नंदुरबारमधील ब्रिटिश कालीन पुलाला भगदाड; पोलीस प्रशासनानं घेतला तातडीनं निर्णय

नंदूरबार : राज्यात अनेक भागात पाऊस जोरदार सुरु असून, काही मोठे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. अशातच नंदुरबार-धुळे जिल्ह्याला जोडणाऱ्या तापी नदीवरील सारंगखेडा पुलाला आज मोठा भगदाड पडला. यामुळे या भागांमध्ये एकच खळबळ उडाली. पोलीस प्रशासनाने तातडीने हा पुल वाहतुकीसाठी बंद केला आहे.

नंदुरबार-धुळे जिल्ह्याला जोडणारा हा पुल शंभर वर्ष जुना आहे. तीनच वर्षांपुर्वी याचे ऑडीट करुन यावर दुरुस्ती घेण्यात आली होती. दरम्यान, आज शनिवारी या पुलावर मोठा भगदाड पडला.  दोंडाईच्या बाजूने पुलावरील रस्त्याचा भराव वाहून गेल्याने पुलावर भगदाड पडून त्याभागावरील रस्त्याला तडे देखील निर्माण झाले आहे.

सध्य़ा सारंगखेडा बॅरेजमधून तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग असल्याने तापी नदीला पुर सदृश्य परिस्थीती आहे. अशातच पुलाचा भराव वाहून गेल्याने याकामाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भगदाड पडल्यानंतर दोडांईचा पोलीसांनी नंदुरबार चौफुली तर शहादा पोलीसांनी अनरद बारीजवळून या पुलाकडे येणारी वाहतूक वळवली आहे. आणि याबाबत प्रशासनाने महामार्ग विभागाशी देखील संपर्क केला आहे.