नंदुरबार : नंदुरबार लोकसभेसाठी भाजपच्या उमदेवार खासदार डॉ. हिना गावित यांनी सोमवार, २२ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), रासप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदी महायुतीच्या घटक पक्षांचे सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.
नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच कोणा एखाद्या नेत्याची उमेदवारी दाखल करण्यासाठी इतकी अलोट गर्दी उपस्थित राहिली. एक अर्थाने प्रचंड संख्येत उपस्थित राहून आठही तालुक्यातील गावागावातील समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन घडवले. महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा घडवल्या जात असतानाच आज प्रत्यक्ष रॅली प्रसंगी मात्र खासदार डॉ. हिना गावित यांच्यासाठी सर्वपक्षीय नेते उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले.
उमेदवार महासंसदरत्न खासदार डॉ. हिना गावित यांची ही रॅली सकाळी 11 वाजता त्यांच्या निवासस्थानापासून म्हणजे नंदुरबार येथील विरल विहार सोसायटीतील खोडाई माता रोड वरून काढण्यात आली. या रॅलीत आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय चौधरी, आमदार काशीराम पावरा, ज्येष्ठ नेते भूपेश भाई पटेल, आमदार राजेश पाडवी, शिंदे गटाच्या आमदार मंजुळाताई गावित, विधान परिषद सदस्य आमशा पाडवी, माजी आमदार पद्माकर वळवी, माजी आमदार शिरीष चौधरी, लोकसभा प्रभारी तुषार भाऊ रंधे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, महिला मोर्चा अध्यक्ष सविता जयस्वाल, डॉ. विक्रांत मोरे व अन्य मान्यवर रॅलीच्या अग्रभागी होते. यावेळी रस्तो रस्ती फडकणारे पक्षाचे ध्वज, ‘पाहिली का गर्दी, राहशील का उभा’ यासारख्या घोषणा, वाजणारे ढोल ताशे, मोदी आणि हिनाताई यांचे मुखवटे लावून नाचणारे तरुण- तरुणी हे लक्ष वेधून घेत होते.
महायुती मधील सर्व मित्र पक्षांचे नंदुरबार, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, नवापूर, शहादा, शिरपूर आणि साक्री या आठही तालुक्यातील प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.
एवढ्या मोठ्या संख्येने लोक उमेदवारी दाखल करण्यासाठी सोबतीने आले हे पाहून माझी ऊर्जा आणखी वाढली आहे. माझ्या कामावर लोकांनी दाखवलेल्या या विश्वासाच्या बळावर मी पुन्हा उमेदवारी दाखल केली आहे. ही उमेदवारी दाखल करताना महायुतीमधील घटकांचे सर्व संबंधित नेते आजी-माजी आमदार उपस्थित राहिले म्हणून मी त्या सर्वांचे आभारी आहे, असे मत खासदार डॉ. हिना गावित यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले .