( वैभव करवंदकर )
नंदुरबार : शहरातील भोणे फाट्याजवळ बुधवारी रात्री झालेल्या स्फोटाने मोठी खळबळ उडाली. घराच्या भिंती थरथरल्या इतका मोठा आवाज नेमका कशाच्या स्फोटाने आला ? हा प्रश्न पडला. दरम्यान, फुग्याच्या गॅसशी संबंधित साहित्याचा स्फोट असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. यात दोन लहान बालके गंभीर जखमी झाले. याबाबत शहर पोलिसांत एका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील भोणे फाटा जवळील गरीब वस्तीत 17 जानेवारी रोजी रात्री 10:45 वाजेच्या सुमारास परिसर हादरवून सोडणारा आवाज आला. नगरपालिका घरकुल इमारत, वडार वसाहत, गांधीनगर, गोपाळ नगर, जयचंद नगर इतक्या सर्व भागातून लोक धावून आले. या घटनेत कापडी तंबू सारखी उभारलेली ती झोपडी (पाल) आणि त्यातील सामान उध्वस्त झालेले दिसले.
या घटनेत दोन लहान मुली जायबंदी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. स्फोटाचा दणका एवढा होता की झोपडीतील दहा वर्षीय मुलीचा एक हात तुटला तर लहान घ्या दुसऱ्या तान्ह्या कोवळ्या मुलीच्या डोक्याला गंभीर इजा झालेली पाहायला मिळाली असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
छोट्या बॉम्बस्फोटासारखा झालेला तो आवाज नेमका कसला होता? याचा उलगडा मात्र झालेला नाही. घटनास्थळी स्फोटाच्या कुठल्याही खुणा आढळून आलेल्या नाहीत. तथापि, फुगे भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसच्या साहित्याचा स्फोट असल्याचे प्रथमदर्शनी आढळले असून ज्या झोपडीत दुर्घटना घडली तो झोपडी मालक पुनमलाल भोसले याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे,असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पूनमलाल मध्य प्रदेशातील बिजूवेडी गावातील रहिवासी आहे. हा परिवार परप्रांतीय असून कालच 17 जानेवारी 2024 रोजी दुपारी तिथे राहायला आला होता आणि आल्यापासून त्यांचे जोरदार भांडण आपसात चालू होते असे भोवतालच्या रहिवाशांनी सांगितले.
दरम्यान, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक निवृत्ती पवार, सहायक निरीक्षक नंदा पाटील आणि पथकाने रात्रीपासून सर्व स्थिती हाताळली. प्रकृती चिंताजनक असल्याने मुलींना सुरत येथे हलविण्यात आले तसेच स्पोट नेमका कसला होता, याचा अधिक तपास करण्यासाठी तज्ञांचे स्वतंत्र पथक पाचारण करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.