नंदुरबारात २८ वर्षांच्या खंडानंतर होणार ‘या’ स्पर्धा

नंदुरबार : शहरातील श्री काशीनाथ बाबा मंदिर सेवा समितीतर्फे मंगळवारी (दि. १२) खुल्या मैदानी कुस्ती स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबारसह धुळे, जळगाव, मालेगाव, अमळनेर, भुसावळ आणि मध्य प्रदेश राज्यातील नामांकित मल्ल या कुस्ती स्पर्धाना हजेरी लावणार आहेत. २८ वर्षांच्या खंडानंतर या स्पर्धा यंदा रंगणार आहेत.

धुळे रस्त्यावरील वाघेश्वरी माता मंदिरापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या श्री काशीनाथ बाबा मंदिरावर तब्बल ५१ वर्षांनंतर गतवर्षी नंदुरबार नगरपालिकेतर्फे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या माध्यमातून हायमस्ट दिवा लावल्यामुळे मंदिर परिसर प्रकाशमय झाला आहे. गवळी समाजासह असंख्य भाविकांना नवसाला पावणाऱ्या श्री काशीनाथ बाबा मंदिराची स्थापना कार्तिक वद्य अमावास्या १२ डिसेंबर १९७१ रोजी करण्यात आली.

या मंदिरात महादेवाची पिंड, नंदी तसेच हनुमानाची मूर्ती आहे. स्थापनेपासून दरवर्षी श्री काशीनाथ बाबा मंदिराचा यात्रोत्सव होत असे. नंदुरबार शहरात सर्वप्रथम खुल्या मैदानी कुस्ती स्पर्धाचे आयोजन श्री काशीनाथ बाबा सेवा समितीतर्फेच करण्यात आले. याशिवाय रेड्यांची झुंजदेखील प्रमुख आकर्षण होते. अस्सल तांबड्या मातीतील कुस्तीची परंपरा टिकवून ठेवणाऱ्या दिवंगत
मत्ताच्या स्मृती कायम ठेवून आठवणींना उजाळा देण्यासाठी पुनश्च खुल्या मैदानी कुस्ती स्पर्धांचे यावर्षी आयोजन करण्यात आले आहे.

हे सर्व उपक्रम सन १९९५ पर्यंत अखंडपणे सुरू होते. मात्र त्यानंतर कुस्त्यांचे फड बंद झाले. विनामूल्य असलेल्या या कुस्ती स्पर्धांचे प्रमुख आकर्षण म्हणजे २० वर्षाच्या तरुणांपासून ७० वर्षाच्या ज्येष्ठ पैलवानांच्या कुस्ती पाहण्याची यंदा सुवर्णसंधी आहे. धुळे रस्त्यावरील हॉटेल हिरा एक्झिक्युटिव्ह शेजारील घोडा मैदान येथे१२ डिसेंबर रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत कुस्ती स्पर्धा होतील. कुस्ती लढणाऱ्या विजेत्या पैलवानांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात येणार आहेत, अशी माहिती श्री काशिनाथ बाबा सेवा समितीचे समन्वयक तथा शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे अध्यक्ष महादू हिरणवाळे आणि नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव जय मराठे यांनी दिली श्री काशिनाथ बाबा मंदिर सेवा समिती, शहीद शिरीषकुमार मित्र मंडळ, नंदुरबार तसेच राष्ट्रीय तालीम संघ नंदुरबार यांच्या सहकायनि खुल्या मैदानी कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या आहेत.