नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरचीची विक्रमी आवक; दर स्थिरावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान

नंदुरबार : अवकाळीच्या संकटानंतर नंदुरबार मधील मिरची बाजार सुरू झाला असून मिरचीचे विक्रमी आवक होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक आवक बाजार समितीत झाले आहे. आवक वाढली असली तरी मिरचीचे दर मात्र स्थिर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी मिरचीची बाजारपेठ म्हणून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिरची खरेदीचा एक लाख क्विंटलचा टप्पा पार झाला असून अवकाळी पावसाच्या संकटानंतर पंधरा दिवसांनी बाजारपेठ सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी बाजारपेठेत मोठी आवक होती. त्याच प्रमाणे दुसऱ्या दिवशीही ही आवक विक्रमी असल्याचे दिसून आले. बाजारामध्ये ६०० तो ७०० वाहनांतून जवळपास दहा ते पंधरा हजार क्विंटल मिरची विक्रीसाठी दाखल झाली आहे. या मिरचीला प्रतवारीनुसार दर मिळत असून ओल्या लाल मिरचीचे दर ४ हजारांपासून ते ६००० रुपयांपर्यंत आहेत. तसेच कोरड्या लाल मिरचीला ७००० पासून ते १६ हजार रुपये क्विंटलपर्यंत दर मिळत आहेत. दरम्यान, एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच पुन्हा मिरची बाजारपेठ पुन्हा सुरू झाला असून आवक वाढूनही मिरचीचे दर कायम असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.