नंदुरबार लोकसभा : यंदाही ‘भाजप विरुद्ध काँग्रेस’ सामना की बिरसा फायटर्सही लढणार ?

Nandurbar Lok Sabha : लोकसभेच्या निवडणुकांचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. त्यामुळे आपल्याविरोधात कोण उभे राहणार, याची चर्चा जोरात आहे. नंदुरबार लोकसभा ही काँग्रेसची तशी परंपरागत जागा. मात्र जवळपास १२ (१९६७ ते २००९) वेळा खासदार निवडून आणणाऱ्या काँग्रेसची ही जागा मोदी लाटेत म्हणजेच २०१४ साली भाजपकडे गेली. कधीकाळी हा मतदारसंघ स्व.माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण मोदी लाटेत डॉ. हिना गावित यांनी नंदुरबार लोकसभेवर विजय मिळवला. मुख्यत: काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच नंदुरबार लोकसभेत लढत होते. यावेळी मात्र बिरसा फायटर्सकडूनही (आदिवासी संघटना) लोकसभेसाठी तयारी सुरू झाल्याचं चित्र आहे. यामुळे यावर्षी होणारी निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

नंदुरबार लोकसभा मतदार संघ पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला होता. स्व.माणिकराव गावित यांनी सलग नऊ पंचवार्षिक या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. 2014 च्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेल्या ज्येष्ठ नेते डॉ.विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉ. हीना गावित यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी या मतदार संघात पहिल्यांदा भाजपला यश मिळवून दिले. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसकडून के.सी.पाडवी यांना या मतदार संघात उमेदवारी देण्यात आली त्यांनी चांगली लढत दिली होती.

राज्यात विजयी झालेल्या भाजपा उमेदवारांचे मताधिक्य लाखांच्या पुढे आसताना मात्र या मतदार संघात भाजपच्या उमेदवाराचा लीड कमी झाला होता या गोष्टींचा विचार करत काँग्रेसकडून निवडणूक रणनीती ठरवली जात असून त्यासाठी तयारी सुरु झाली आहे. तर भाजपकडून खासदार डॉ. हीना गावित यांना पुन्हा उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित आहे. नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठीची लढत तसं तर भाजप आणि काँग्रेस मध्येच आहे. यावेळी मात्र नंदुरबारात बिरसा फायटर्सकडूनही (आदिवासी संघटना) लोकसभेसाठी तयारी सुरू झाल्याचं चित्र आहे. संघटनेकडून राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. याबाबत त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे नंदुरबार लोकसभा निवडणूक लढत भाजप, काँग्रेस आणि बिरसा फायटर्स यांच्यात रंगणार असल्याचे निच्छित झाले आहे. दरम्यान, हा मतदार संघ आदिवासी बहुल असून या मतदार संघात आरक्षण तसेच विकास कामांमधील भेदभाव यासह रोजगार, आरोग्य आणि इतर मोठ्या विषयांवर निवडणूक रंगणार हे मात्र निश्चित…