नंदुरबार : तालुक्यातील रनाळे येथे किरकोळ कारणावरुन निराधार महिलेचा खून झाल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयीत युवकाविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गौरव सोनवणे असे आरोपीचे नाव असून, त्यास २२ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथील बेघर वस्तीत राहणाऱ्या निराधार महिला सुमित्राबाई रघुनाथ सोनार (६४) या घरकुलात एकट्या राहत होत्या. त्यांच्या घराजवळच संशयीत गौरव राजेंद्र सोनवणे हा वास्तव्यास होता. १६ रोजी दुपारच्या सुमारास सुमित्राबाई सोनार यांच्या घरासमोरून गौरव राजेंद्र सोनवणे हा बैलगाडी घेवून जातो या कारणावरून या दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणातून संशयीत गौरव सोनवणे याने सुमित्राबाई सोनार यांना हाताबुक्क्याने मारहाण केली. तोंडावर व डोक्यावर विट मारून गंभीर जखमी केले. त्यांचा घरातून ओढत नेत दिशाभूल करण्यासाठी घराजवळील बैल बांधण्याच्या जागेत टाकून दिले. यात सुमित्राबाईंचा त्यांचा मृत्यू झाला. भांडण सुरु असतांना गौरवची समजूत घालणाऱ्या ग्रामस्थांना सुद्धा त्याने दमदाटी करुन हाकलून दिले. निराधार महिलेची भर दिवसा हत्या झाल्यामुळे रनाळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी भेट दिली. नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड, हेकॉ. राजेंद्र धनगर, ज्ञानेश्वर पाटील, सचिन सैंदाणे यांचा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याबाबत प्रल्हाद रघुनाथ सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गौरव राजेंद्र सोनवणे याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहेत.