नगरच्या प्रवरा नदीत NDRF पथकाची बोट उलटली; जळगावच्या जवानासह तीन जणांचा मृत्यू

जळगाव : अकोलेमधील अहमदनगर-प्रवरा नदीत बुडालेल्या लोकांच्या शोधासाठी गेलेली एसडीआरएफ पथकाची बोट उलटली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मृत जवानांमध्ये जळगाव जिल्ह्यातील एका जवानांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. वैभव सुनील वाघ (रा.पांढरद, ता. भडगाव) असं या मृत जवानाचे नाव आहे.

अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे बुधवार, २२ रोजी दुपारी प्रवरा नदीपत्रात पोहण्यासाठी गेलेले सागर पोपट जेडगुले (25) व अर्जुन रामदास जेडगुले (18) हे दोघे तरुण बुडाले होते. त्यातील सागर जेडगुले याचा मृतदेह सापडला तर अर्जुन जेडगुले याचा शोध सुरू होता. या तरुणाचा शोध घेण्यासाठी धुळ्यातील एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

या तरुणाचा तपास सुरू असतानाच एसडीआरएफ पथकाची बोट आज गुरुवारी सकाळी उलटली. या बोटमध्ये पथकातील चार जण आणि स्थानिक असे पाच जण प्रवरा नदी पात्रात बुडाले. यातील तीन जणांचे मृतदेह सापडले असून अन्य दोन जणांचा शोध सुरू आहे. मृत जवानांमध्ये जळगाव जिल्ह्यातील वैभव सुनील वाघ (रा.पांढरद, ता. भडगाव) या जवानाचा समावेश आहे.

वैभव सुनील वाघ यांच्यासह धुळे एसडीआरएफ बलगट क्रमांक 6 चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, पोलीस शिपाई राहुल पावरा या तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे पोलीस दलासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.