नगरदेवळ्यात मोकाट जनावरांचा हैदोस; शेतकरी त्रस्त

नगरदेवळा ता.पाचोरा : नगरदेवळा गावातील मोकाट गुरे ढोरे यांचा वावर एवढा वाढला आहे की गावालगत असलेल्या शेतांची अवस्था ही पीक पिकवण्यासारखी नसून फक्त गावातील मोकाट जनावरे चरण्याचे ठिकाण झाले आहेत. शेतकरी बांधव रात्रंदिवस एक करून, रात्री बेरात्री पाणी भरून पोटच्या मुलासारखं पिकांना वाढवतात. परंतु गावातील मोकाट जनावरे रात्री गावालगतच्या शेतांमध्ये घुसून मका, केळी व इतर पूर्ण पिकांचा फडसा पाडत आहेत. कधी कधी चाळीस ते पंचेचाळीस गाई एकाच शेतात घुसून हिरवेगार शेत फस्त करून टाकतात, तसेच नासधूस ही करतात. याप्रकारे कष्ट करून हातातोंडासी आलेला घास शेतकऱ्यांच्या हातातून हिरावून घेतला जात आहे.त्यामुळे या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना पिक रक्षणासाठी आळीपाळीने रात्रभर शेतात पहारा द्यावा लागत आहे.सदर मोकाट जनावरे ही नगरदेवळा गावासह ठाकरे रस्ता,ग.नं.291 शिवार,घुसर्डी रस्त्यालगत असलेली शेती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपद्रव माजवत असून पिकांचे नुकसान करत आहेत.त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत मोकाट जनांवराच्या मालकांना समज द्यावी किंवा ऐकत नसतील तर त्या मालकांवर गुन्हा दाखल करावा किंवा मोकाट जनावरे पकडून गोशाळेकडे सुपुर्द करावेत अशी त्रस्त शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे.