नगरदेवळ्यात वादळी पावसाने केळी बागा जमिनदोस्त, अमोल शिंदेंची पाहणी

नगरदेवळा ता. पाचोरा : औट्रमघाट व नागदच्या दिशेकडून मंगळवारी 4 जून रोजी संध्याकाळी आलेल्या वादळी  पावसाने नगरदेवळा व परिसरातील केळीमालाने बहरलेल्या उभ्या केळी बागा पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या. कृषी विभागाकडून ६ रोजी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यात आले.

यावर्षीचा उन्हाळा शेतकऱ्यांसह राज्यभरातील नागरिकांसाठी भीषण ठरलेला असतांना फेब्रुवारी मार्चमध्येच भूजल पातळी खालावलेली व एप्रिलमध्ये 44 ते 45 डिग्री तापमान; अशा परिस्थितीतही अनेक शेतकऱ्यांनी जिवापाड परिश्रम करून केळीबागा, इतर फळबागा व इतर पिकांची जोपासना केली होती व भीषण उन्हाळ्यात या हिरव्यागार बागा डौलाने उभ्या होत्या.परंतु चार जून रोजी संध्याकाळी आलेल्या मान्सूनपूर्व वादळी मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील केळीबागांसह इतर पिके अक्षरशः मोडून पडले व जमीन दोस्त झाले.

नगरदेवळा येथील विनोद रामलालसिंग परदेशी,गोरख उत्तम महाजन,सुनील उत्तम महाजन,योगेश भारतसिंग परदेशी,महेंद्र नंदलालसिंग परदेशी यांच्यासह इतर अनेक शेतकऱ्यांच्या केळीबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.प्रदिप भोलासिंग परदेशी यांच्या पोल्ट्री फार्म च्या शेडचे पत्रे उडून शेडचे व कोंबड्यांचे मोठे नुकसान झाले.

शेतकऱ्यांचे गणित बिघडले

मेहनतीने टिकवलेल्या या केळी व इतर पिकांच्या बागांतून येणाऱ्या उत्पन्नामधून येणाऱ्या खरिपात उर्वरित क्षेत्रात चांगली शेती करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशेचा अक्षरशः चक्काचूर झाला.

अमोल शिंदेंची तात्काळ धाव
लोकसभा निवडणुकांमध्ये एकंदरीत महाराष्ट्राच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात भाजप उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने पाचोरा येथे भाजपा कार्यकर्त्यांद्वारे स्मिता वाघ यांच्या विजयानिमित्त मोठा आनंद उत्सव साजरा करण्यात आला. हा आनंदोत्सव पार पडताच भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे हे येथील नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या दु:खाचा टाहो फोडला. यावेळी अमोल शिंदे यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून अधिकार्‍यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना धीर दिला.

या गावांमध्ये अधिक नुकसान
नगरदेवळा परिसरातील संगमेश्वर,चुंचाळे,आखतवाडे, पिंपळगाव,निपाणे,नगरदेवळा सिमसह परिसरातील केळी बागा,इतर फळबागा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

गुरुवारी 6 जून रोजी नगरदेवळा सिम क्षेत्रातील साधारण 35 शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नगरदेवळा सिम
तलाठी दीपाली बावणे व कृषी सहाय्यक रामेश्वर पाटील यांच्या टीमने पाहणी करून पंचनामे केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील उपस्थित होते.नगरदेवळा सह परिसरातील इतर गावांतील नुकसानग्रस्त शेतकरी ही प्रशासनाकडून तात्काळ मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत.