नगरदेवळ्यात हिंस्र कुत्र्यांनी ५० गुरे फाडली, एक बालकाला भोसकले

नगरदेवळा ता.पाचोर : नगरदेवळ्यात गेल्या तीन महिन्यांपासून भटक्या हिंस्र कुत्र्यांच्या टोळीने येथील विशेषतः पिंपळगाव शिवारामध्ये हैदोस घातला आहे. या कुत्र्यांनी ५० पेक्षा अधिक गुरे ठार मारल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच नगरदेवळा शहरातील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सापडलेल्या बालकाने आरडाओरड केल्याने तो बालंबाल बचावला आहे.

बकऱ्या, गाई, म्हशी, वासरे, पारडू अशा विविध प्राण्यांवर हे कुत्रे हल्ले चढवून ठार मारत आहेत. रात्रीच्या वेळेस,तसेच दिवसा सुद्धा शेतकरी दूध काढून घरी परतल्यानंतर ही दहा ते बारा कुत्र्यांची टोळी या गुरांना घेरते.एकापेक्षा अधिक गुरे जरी सोबत बांधलेली असली तरीही कुत्र्यांची ही टोळी त्यांच्यावर चहुबाजूने हल्ला करते व ठार मारते.येथील शिंदोळ रोड लगत किशोर पवार यांच्या शेतात दोन गाभण म्हशी आणि एक वासरू व एक वासरी या कुत्र्यांनी ठार मारली.तसेच प्रवीण उदेसिंग राऊळ यांचे दोन पारडू,नाना मांडोळे यांचे एक वासरू व एक पारडू,चंदू जालमसिंग राऊळ यांचे एक पारडू,सुभाष गडबडसिंग राऊळ यांच्या दोन वासऱ्या,बापू माणिक पाटील यांची एक वासरी,अमोल राजेंद्रसिंग राऊळ यांचे एक वासरू, योगेश मधुकर राऊळ यांचा एक हेला,भैया दत्तूसिंग राऊळ यांचा एक हेला,नंदू जालमसिंग राऊळ यांचा एक गोऱ्हा अशी अनेक जनावरे गेल्या तीन महिन्यात या कुत्र्यांनी ठार मारली आहेत.तसेच तीन दिवसांपूर्वी मध्यरात्री पांडुरंग शिवराम भामरे यांच्या एका दुभत्या गायीवर या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला चढवला.परंतु रस्त्याने जाणाऱ्या एका शेतकऱ्याच्या ते लक्षात आल्याने त्यांनी अर्ध्या रात्री अनेक शेतकऱ्यांना गोळा करून या गाईची सुटका करण्यात आली असली तरी ही गाय सध्या गंभीर जखमी झाली आहे व या गाईचे वासरू १० दिवसांपूर्वीच या कुत्र्यांनी मारले आहे.
शेतीत परवडत नाही म्हणून पशुपालनाचा आधार घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये यामुळे प्रचंड दहशत पसरलेली आहे व रात्री अपरात्री एकट्याने शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांवर सुद्धा ह्या हिंस्र कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला होण्याची भीती पसरलेली आहे.

तसेच येथील परदेशी गल्लीत दिनांक 19 जानेवारी रोजी संध्याकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान चि.यश शैलेशसिंग परदेशी या तेरा वर्षांच्या बालकाला दहा-बारा कुत्र्यांनी घेरून हल्ला चढवला.परंतु त्या बालकाने आरडाओरड केल्यानंतर लोक जमा झाले व त्या बालकाची सुटका करण्यात आली.तरीसुद्धा त्या बालकाच्या पोटावर कुत्र्यांच्या पंजांमुळे जखमा झाल्यामुळे त्याच्यावर तातडीने औषधोपचार करण्यात आले.सदर घटनेमुळे पालक वर्गात सुद्धा प्रचंड भीती पसरलेली आहे.
जेव्हा एखादा वाघ,बिबट्या वगैरे जंगली प्राणी हिंस्र होऊन माणसांवर हल्ले करत असेल व वन विभागाच्या तावडीत सापडत नसेल तर शासनाकडून सदर हिंस्र वन्य प्राण्याला गोळी घालून ठार मारले जाते.त्याचप्रमाणे येथील पिंपळगाव शिवारातील हिंस्र कुत्र्यांच्या टोळीला पकडून त्यांचा बंदोबस्त करावा किंवा गोळी घालून ठार मारावे;तसेच नगरदेवळा शहरात मोठ्या संख्येने वाढलेल्या भटक्या कुत्र्यांचा ही बंदोबस्त करावा अशी पशुपालक शेतकरी व पालक वर्ग यांच्याकडून मागणी करण्यात येत आहे आणि कुत्र्यांनी मारलेल्या पशूंच्या मालकांना प्रशासनाने मदत जाहीर करावी अशीही मागणी करण्यात येत आहे.

साधारण दहा महिन्यांपूर्वी माझी गाभण म्हैस कुत्र्यांनी फाडली.त्यावेळेस आम्ही ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे तोंडी तक्रार दिली. तसेच गुरांचा दवाखाना यांच्याकडे ही तोंडी तक्रार दिली.तसेच वन विभागाला सुद्धा फोन करून माहिती दिली.परंतु आम्ही कुत्र्यांना पकडू शकत नाही,मारू शकत नाही,ते आमचे काम नाही,कुत्र्यांना मारण्यास शासनाची परवानगी नाही अशा प्रकारची आम्हाला सर्वांकडून उत्तरे आली आणि या त्रासाला कंटाळून आम्ही शेतकऱ्यांनी वैयक्तिकरित्या कुत्र्यांना पकडून मारलं तर आमच्यावरही कार्यवाही होऊ शकते अशी आम्हाला माहिती देण्यात आली आहे.त्यामुळे आम्ही आमच्यावरील संकट कुणाला सांगावे?असा मोठा प्रश्न पडलेला आहे.

-इंद्रनील साहेबराव भामरे,शेतकरी व पशुपालक,नगरदेवळा.

शेती करणे कठीण झाल्याने अनेक शेतकरी पशुपालनावर उदरनिर्वाह करीत आहेत.प्रशासनाने तातडीने या हिंसक कुत्र्यांच्या टोळीचा बिमोड करावा.
-नामदेव विश्वास महाजन,तालुका अध्यक्ष,शेतकरी संघटना.