नगरविकास विभागाच्या आदेशाने भुसावळ पालिकेत खळबळ

जळगाव : भुसावळ पालिकेचे माजी नगराध्यक्ष रमण भोळे व नऊ नगरसेवकांना राज्याच्या नगरविकास विभागाने सहा वर्षांसाठी अपात्र (अनर्ह) ठरविले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशांना या नगरसेवकांनी आव्हान दिले होते.

माजी मंत्री- आमदार एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भुसावळ पालिकेतील भाजपचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नगरसेवक अमोल मनोहर इंगळे, लक्ष्मी रमेश मकासरे, सविता रमेश मकासरे, प्रमोद पुरूषोत्तम नेमाडे, मेघा देवेंद्र वाणी, बोधराज दगडू चौधरी, शोभा अरूण नेमाडे, किरण भागवत कोलते, शैलजा पुरूषोत्तम नारखेडे व पुष्पाबाई रमेशलाल बतरा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याविरूद्ध भाजपकडून जिल्हाधिकार्‍यांकडे अपील दाखल करण्यात आले होते. नगराध्यक्ष रमण भोळे व नऊ नगरसेवक यांनी महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता 1986 व नियम 1987 च्या कलम 7(3) अन्यये पक्षांतर बंदी नियमांचे उल्लंघन केले म्हणून त्यांना अपात्र (अनर्ह ) ठरवावे म्हणून अपील दाखल करण्यात आले होते. भुसावळ पालिकेत भाजपची 29 नगरसेवकांची आघाडी होती.

नोंदणीकृत असलेल्या या आघाडीत हे नगरसेवक होते. मात्र या नगरसेवकांनी 17 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात या पक्षात प्रवेश केला होता. त्याविरूद्ध प्रथम जिल्हाधिकार्‍यांकडे भाजप गटाकडून अपील दाखल करण्यात येऊन हे नगरसेवक व नगराध्यक्षांना अपात्र ठरवावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणी होऊन या नगरसेवक व नगराध्यक्षांना जिल्हाधिकार्‍यांनी 18 जुलै 2022 रोजी अपात्र ठरविले होते.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला नगराध्यक्ष रमण भोळे व अन्य नगरसेवकांनी राज्याच्या नगरविकास विभागाकडे अपील दाखल करून आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी होऊन मंगळवारी 18 रोजी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी यांनी आदेश देऊन माजी नगराध्यक्ष रमण भोळे व अन्य नऊ नगरसेवकांना जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र (अनर्ह) ठरविल्याचे आदेश कायम ठेवले जात असल्याचे आपल्या आदेशात म्हटले आहे.