नरेंद्र मोदींच्या हस्ते भोपाळमधून ५ ‘वंदे भारत’ना हिरवा झेंडा

भोपाळ : अमेरिका, इजिप्त दौर्‍याहून परतलेल्या पंतप्रधान मोदींचा एकदिवसीय मध्य प्रदेश दौरा आहे. या दौर्‍यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये भोपाळ ते इंदोर, भोपाळ ते जबलपूर, गोवा-मुंबई, बंगळुरू-हुबळी आणि पाटणा-रांची या वंदे भारत एक्स्प्रेसचा समावेश आहे.

या सोहळ्याला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनच्या उद्घाटन सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी भोपाळमधील मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ अभियानांतर्गत देशभरातील निवडक ३ हजार बुथ कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

बहुप्रतिक्षित मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसची सेवा कोकण रेल्वे मार्गावर चालवली जाणार आहे. कोकण रेल्वेच्या मान्सून मुंबई ते मडगाव या दरम्यानची वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. मुंबईहून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी वंदे भारत ट्रेनची सेवा असेल. तर मडगावहून मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू राहील.