नवदुर्गेचे प्रथम स्वरुप शैलपुत्री देवी; ‘या’ रंगाला आहे महत्त्व

तरुण भारत लाईव्ह । १५ ऑक्टोबर २०२३। शारदीय हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे. नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण नऊ रात्री आणि दहा दिवस साजरा होतो. प्रथम चैत्र महिन्यात (ग्रेगोरियन कॅलेंडरच्या मार्च/एप्रिलमध्ये) आणि पुन्हा शारदा महिन्यात साजरा होतो. घटस्थापना म्हणजे बीजपरीक्षण होय. आपल्या शेतात जी पीकं पिकवली जातात, ज्यातून आपलं पोट भरतं त्याप्रति श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. या काळात शेतातील पिकांची कापणी झालेली असते, घरी नवीन धान्य आलेलं असतं. घटस्थापनेला घटासमोर आपल्या शेतातील माती आणली जाते.

असे म्हटले जाते की शारदीय नवरात्री धर्मावर अनीतीवर आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. धार्मिक मान्यतेनुसार या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवी पृथ्वीवर येते आणि पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते. देवीच्या आगमनाच्या आनंदात हे नऊ दिवस देशभरात दुर्गा उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. नवदुर्गापैकी दुर्गेचे पहिले रूप ‘शैलपुत्री’ या नावाने ओळखले जाते. शैलपुत्री दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे. पर्वतांचा राजा हिमालय यांची मुलगी म्हणून तिने जन्म घेतला. त्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ‘शैलपुत्री’ हिची पूजा, आराधना केली जाते.

नवरात्रीचा पहिला रंग केशरी आहे. सुर्याची सकाळची किरणे जशी तेजोमय असतात तसा हा तेजोमयी रंग. दैवी शक्तींचे प्रतिनिधित्व करणारा. नकारात्मकतेचा नाश करणारा, अंधार नाहीसा करणाऱ्या तेजाचा केशरी रंग! लाल आणि पिवळ्या रंग एकत्र केल्यास त्याच्या संयोगाने बनणारा हा केशरी. म्हणूच तो शक्ती, उत्साह आणि आरोग्य यांच्याशी संबंधित आहे.