तरुण भारत लाईव्ह । १३ ऑक्टोबर २०२३। नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. नवरात्र राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नवरात्रीत मोठ्या प्रमाणात गरबा-दांडियाचे आयोजन केले जाते. नवरात्र उत्सवासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व गरबा दांडिया आयोजकांना आयोजनाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा तसेच रुग्णवाहिका तैनात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसात गरबा दांडिया मोठ्या प्रमाणात खेळला जातो. अनेकदा राजकीय पक्षांच्या माध्यमातून रास गरब्याचे आयोजन करण्यात येते. त्यात आयोजकांच्या वतीने अनेकदा प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जात असली तरीही काही आयोजक याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. त्यामुळे दांडियाचे आयोजन करताना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि आयोजनाचा जागी सर्व सुविधांनी सुसज्ज अशी रुग्णवाहिका ठेवणे आयोजकांना बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
गरबा दांडिया खेळताना अनेक जण जल्लोषात येऊन तसेच बेभान होऊन खेळत असतात. अशावेळी काही वेळा हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्यासारख्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. अशी कोणतीही वैद्यकीय परिस्थिती उदभवल्यास त्या व्यक्तीला तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असते. ही गरज लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी अशी सुविधा सर्व आयोजकांनी यावेळी उपलब्ध करून द्यावी असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.