नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ मे रोजी नवीन संसदेचे उद्घाटन करणार आहेत. संसदेच्या नवीन इमारतीविषयी संपूर्ण देशाला उत्सुकता लागली आहे. संसदेची जुनी इमारत व नवीन इमारत यांच्यात नेमका कसा फरक आहे. नवीन संसद भवन कोणी बांधले? डिझाइन करणारा आर्किटेक्ट कोण आहे? याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
संसदेच्या नवीन इमारतीची पायाभरणी १० डिसेंबर २०२० रोजी झाली. नवीन संसद भवन ही त्रिकोणी आकाराची चार मजली इमारत आहे. संपूर्ण कॅम्पस ६४,५०० चौरस मीटर आहे. येथे ज्ञानद्वार, शक्ती द्वार आणि कर्मद्वार असे तीन मुख्य दरवाजे आहेत. नवीन संसद भवन टाटा समूहातील टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीने बांधले आहे. सध्या टाटा प्रोजेक्ट्सचे अध्यक्ष डॉ. प्रवीर सिन्हा आणि एमडी विनायक पै आहेत.
गुजरातमधील आर्किटेक्चर फर्म एचसीपी डिझाईन्सने नवीन संसदेचे डिझाइन तयार केले आहे. या इमारतीचे मुख्य वास्तुविशारद बिमल पटेल आहेत. या संसद भवनाची निर्मिती टाटा प्रोजक्टने ८६२ करोड रुपयांमध्ये केली आहे. या संसदेत ८८८ सदस्य बसू शकतात. तसेच राज्यसभेत ३८४ सदस्य बसू शकतात. नवे संसद भवन रेकॉर्ड वेळेत बनवले आहे.