मुंबई : नागपूर येथे झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे महानगरातील अनेक भागांत पाणी साचून नागरिकांचे मोठ्या प्रमणात नुकसान झाले आहे. केवळ तीन तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे याठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बाधित परिसरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पहाटेपासूनच सेवाकार्यात गुंतल्याचे दिसून आले. आपत्ती किंवा आणीबाणीच्या प्रसंगी स्वयंसेवक सदैव तत्पर व सज्ज असतात, याची पुन्हा एकदा प्रचिती दिसून आली.
मुसळधार झालेल्या पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होऊन नाग नदीला आलेल्या पुरामुळे अनेक सेवा वस्ती पाण्याखाली गेल्या. घर, रस्ते, बस स्थानक आणि अनेक परिसरांमध्ये पाणी शिरल्याने संपर्कही विस्कळीत झाला. प्रभावी भागात पोहोचलेल्या स्वयंसेवकांनी पूरग्रस्तांना प्रथम सुरक्षितस्थळी हलवले. त्याचबरोबर त्यांच्यासाठी फराळ, खाद्यपदार्थ, फळे, बिस्किटे, पाण्याच्या बाटल्या आणि सुका नाश्ता यांची व्यवस्था करून ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्थाही त्यांनी केली.
या सेवाकार्यात नागपूर महानगरातील सेवा विभागाच्या स्वयंसेवकांसह सामाजिक संस्था व नागरिकांनीदेखील सहकार्य केले. पुढील काही दिवस या भागांतील परिस्थिती स्थिर होईपर्यंत आवश्यकतेनुसार सेवाकार्य सुरू राहील. आतापर्यंत धरमपेठ, टाकीया, कुह्मार टोली, संगम चाळ, बर्डी फ्लॉवर मार्केट अशा विविध भागांतील १५ हजारांहून अधिक कुटुंबांपर्यंत स्वयंसेवकांचा संपर्क झाला आहे.