नागरिकांनो, ऑनलाईन वीज बिल भरा अन् मिळवा सवलत; किती रुपयांनी?

मुंबई : डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आजच्या या डिजिटल युगात आपण आपले सर्व व्यवहार डिजिटल माध्यमातून करतो. त्याचप्रमाणे, डिजिटल माध्यमातून वीजबिल भरल्यास महावितरण ०.२५ % (रु.५.००) पर्यंत सवलत ग्राहकांना देते. तसेच, गो ग्रीन योजनेत ग्राहकांनी छापील कागदी बिलाच्या ऐवजी ईमेलने येणाऱ्या पेपरलेस बिलाचा पर्याय स्वीकारला तर त्यांना कागदी बिल पाठविणे बंद केले जाते व प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत देण्यात येत आहे.
दरम्यान, महावितरणने राज्यातील सर्व ग्राहकांना ऑनलाईन पध्दतीद्वारे वीज देयक भरण्याची सुविधा २००५ पासून उपलब्ध करुन दिली आहे. ग्राहक केंव्हाही व कुठूनही ऑनलाईन पध्दतीने महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे वीज देयकाचा भरणा करु शकतात. या प्रणालीची कार्यपध्दती महावितरणच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

सदर पध्दतीमध्ये ग्राहक वीज देयकाचा भरणा क्रेडीट / डेबीट कार्ड, नेट बँकींग व यु.पी.आय. इत्यादी इलेक्ट्रॉनीक माध्यमामार्फत करु शकतो. तसेच भारत बिल पेमेंटवर देखील वीज बिल भरणा करता येऊ शकतो. या व्यतिरीक्त महावितरणने RTGS / NEFT द्वारे देयक भरणाकरण्यासाठी सुविधा सर्व लघुदाब औद्योगीक, वाणिज्यक व रु.१०,०००/- पेक्षा जास्त बिल असणाऱ्या लघुदाब घरगुती ग्राहकांना उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यासाठी लागणारी आवश्यक ग्राहकनिहाय बँकेच्या माहितीचा तपशिल वीज बिलावर छापण्यात आलेला आहे.

क्रेडीट कार्ड वगळता इतर सर्व पध्दतीने वीजबिल भरणा नि:शुल्क आहे. तसेच ऑनलाईन पध्दतीने देयकाचा भरणा केल्यास बिल रक्कमेच्या ०.२५ (जास्तीत जास्त रु.५००/-) इतकी सवलत देखील देण्यात आलेली आहे. ऑनलाईन पध्दतीने वीजदेयकाचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून, सदर पध्दतीस भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा २००७ च्या तरतूदी लागू आहेत. सद्यस्थितीत महावितरणचे ६५ लाख ग्राहक सदर सुविधेचा लाभ घेत असुन यातुन दरमहा महावितरणला साधारणत: रु. १,४०० कोटी महसुलाची वसुली होते.

ऑनलाईन पध्दतीने भरणा केल्यास ग्राहकास त्वरीत त्याच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर SMS द्वारेपोच मिळते.तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावर Payment History तपासल्यास भरणा तपशील व पावती उपलब्ध होते. तरी, महावितरणने उपलब्ध करुन दिलेल्या या नि:शुल्क ऑनलाईन विजबिल भरणा सेवांचा सर्व ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन महावितरण भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी केले आहे.