नागरिकांनो काळजी घ्या ! जळगावसह या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी

जळगाव । एकीकडे मान्सूनच्या प्रगतीकडे सर्वांचे डोळे लागले असताना राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.  हवामान खात्याने विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात उष्णतेचा अलर्ट जारी केला आहे. २६ मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी राज्यात उष्णतेचे वारे वाहणार असल्याचे ट्विट केले आहे. आगामी चार दिवस म्हणजेच २६ मे दरम्यान राज्यातील काही भागांत हिट वेव्ह असणार आहे. या काळात नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट
हवामान खात्याकडून जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे तीन दिवस जळगावमध्ये तापमानाचा पारा ४६ अंशावर जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता आणखी वाढणार असून नागरिकांनी काळजी घेण्याच आवाहन करण्यात आला आहे.

दरम्यान, सध्या वाढत्या तापमानाने असह्य करणारा उकाडा जाणवत असून आता नागरिकांचे लक्ष मान्सून पावसाकडे लागले आहे. देशात यंदा मान्सून वेळेवर येण्याची चिन्ह दिसत आहे. मान्सून अंदमान निकोबारमध्ये १९ मे रोजीच पोहचला आहे. त्याची पुढील वाटचाल सुरळीत सुरु असून तो ३१ मे पर्यंत केरळात दाखल होणार असल्याचा अदांज आहे. त्यांनतर महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून येण्याची शक्यता आहे.