मालेगाव । गेल्या दोन वर्षांपूर्वी जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या स्वाइन फ्लयूचा धोका पुन्हा समोर येण्याची भीती आहे. यातच महाराष्ट्रामधील नाशिकच्या मालेगाव शहरात स्वाईन फ्लूची लागण होऊन दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत महापालिका आरोग्य विभागाने घाबरून जाण्याचे कारण नसून साधा सर्दी, खोकला असला तरी देखील उपचार घ्यावेत, अशा सूचना केले आहेत.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, स्वाईन फ्लूने माजी कृषी अधिकारी व एका महिलेचा मृत्यू झालाय. यामुळे मालेगाव महापालिका प्रशासनाचे आरोग्य विभाग पुन्हा एकदा अर्लट मोडवर आले आहे. मृत्यू झालेल्या कुटूंबातील व्यक्तींचा तसेच परिसरातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे.
कोणालाही सर्दी,ताप,खोकल्याची लक्षणे आढळल्यास त्यांनी तातडीने महापालिकेच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री आहेर यांनी केले आहे. साधी लक्षणे असल्याने आपल्याला स्वाईन फ्लू झाला आहे की नाही हे पटकन लक्षात येत नाही. त्यामुळे साधा सर्दी, खोकला असला तरी देखील उपचार घ्यावेत, असं महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
अशी घ्या काळजी
शक्यतो बाहेरचे खाणे टाळा. तुम्हाला सर्दी, खोकला असा त्रास होत असेल तर त्यावर लगेचच उपचार घ्या. पाणी उकळून थंड करून प्या. दिवसातून एकदा तरी स्टीम घ्या. साधी दुखणी अंगावर काढू नका.