नागरिकांनो, सावधगिरीने करा वाहनांची खरेदी, कारण नंदुरबारमध्ये…

नंदुरबार : जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालून चोरट्यांना चोरीच्या मोटारसायकलींसह ताब्यात घेण्याच्या कारवायांना पोलिसांनी गती दिली आहे. यातून ११ महिन्यात चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. १२ पोलिस ठाण्यांतर्गत १५० च्या जवळपास दुचाकींचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

लगतच्या गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील टोळ्यांकडून वाहनाची चोरी करून महाराष्ट्रात त्या वाहनांची विक्री करण्यात येते. यातून बनावट कागदपत्रे असलेली ही वाहने खरेदी करण्यात आल्यानंतर वाहनधारकांची फसवणूक झाल्या आहेत. यामुळे वाहनधारक सावधगिरीने वाहनांची खरेदी करत आहेत.

नुकतेच शहादा पोलिस ठाण्याने चोरट्यांकडून १५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. तत्पूर्वी विसरवाडी, नंदुरबार शहर, नंदुरबार तालुका, उपनगर तसेच तळोदा पोलिस दुचाकी चोरांना ताब्यात घेतले होते.

नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा येथे गेल्या आठवड्यात विनाकागदपत्रे असलेली दुचाकी फिरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. गत ११ महिन्यात १० जणांवर अशा प्रकारे पोलिसांच्या पथकांकडून कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

पोलिस प्रशासनाकडून दर महिन्याला वाहन तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. यातून कागदपत्र नसताना वाहनाचा ताबा बाळगणे, चेसीस क्रमांक आणि आरसीबुक वरील क्रमांकात तफावत असणे आदी प्रकार समोर आल्यावर गुन्हे दाखल होतात. जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात सध्या जिल्ह्यातील १२ पोलिस ठाण्यांतर्गत दुचाकी चोरीचा तपास तीव्र करण्यात आला आहे. तपासणीदरम्यान संबंधितांकडून कागदपत्रे मागणी करून त्याची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे. वर्षअखेर ही तपासणी मोहीम अधिक तीव्र होणार आहे.