नातवासह आजीला ठार करणारा बिबट्या अखेर जेरबंद; आणखी दोन बिबट्यांची दहशत !

तळोदा : बिबट्याच्या हल्ल्यात आठवर्षीय नातवासह ५० वर्षीय आजीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना तळोदा तालुक्यातील काजीपूर शिवारात मंगळवारी घडली. त्यानंतर वनविभागाने लावलेल्या सापळ्यात नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद झाला. मात्र, आणखी दोन बिबटे त्याच ठिकाणी फिरत असल्याने परिसरात दहशती वातावरण आहे.

तळोदा काजीपूर (ता. तळोदा) शिवारात अतुल सूर्यवंशी यांच्या शेतात भगदरी येथील कुटुंब रखवालदार म्हणून काम करत होते. नेहमीप्रमाणे साखराबाई खेमा तडवी (वय ५०) या मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. बराच उशीर झाला मात्र आजी घराकडे परतली नसल्याचे पाहून त्यांची मुलगी व श्रावण हे साखराबाई यांच्या शोधात शेताकडे निघाले. शेताकडे येताच दबा धरून बसलेल्या बिबट्याने श्रावणवर हल्ला चढवला व त्याला ओढून बाजूच्या उसाच्या शेतात नेले. ही घटना पाहून ग्रामस्थांनी आरडाओरड केला.

मुलाला बिबट्या घेऊन गेल्यानंतर पुन्हा आजी साखराबाईचा शोध घेतला असता, त्याचा मृतदेहच आढळला. बिबट्याने साखराबाईचे मानेपासून वरचे डोके व छातीचा अर्धा भाग खाऊन नष्ट केला होता. साखराबाईवर बिबट्याने दुपारी एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान हल्ला केला असल्याचा अंदाज वन विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे श्रावणला वाचवण्यातही यश आले नाही. त्याच्या मानेवर व डोक्यावर बिबट्याच्या हल्ल्यात खोलवर जखमा झाल्याने रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

घटनेनंतर वनविभागाने तात्काळ हालचाली सुरु केल्या. पिंजरा लावला व रात्रभर वन विभागाचे कर्मचारी यांनी पाहारा ठेवला. अखेर पहाटे बिबटया पिंजरामध्ये जेरबंद झाला. मात्र, आणखी दोन बिबटे पिंजरा भोवती फिरत होते असे परिसरातील शेतमळ्यातील रखवाली करणारे सांगत होते. पैकी एक बिबटया जेरंबंद झाला आहे. दोन परीसरात फिरत असल्याने दहशत काय आहे. त्यामुळे या बिबटयानंही जेरबंद करण्यासाठी वनविभाग प्रयत्न करेल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वनविभागने २१ रोजी पिंजरामध्ये अडकलेल्या बिबटया सकाळी ६ ते ७ वाजे दरम्यान घटना स्थळावरून पिंजरा उचलून अज्ञातस्थळी रवानगी केली. जेवढी तत्परता अडकले बिबट्याच्या पिंजरा हलवण्यासाठी वनविभागाने दाखवली तेवढी तत्परता पिंजरा लावण्यासाठी दाखली असती तर दोघांचा जीव गेला नसता. वनविभागाचे अधिकारी माहीती देण्यास  टाळाटाळ का ? असा प्रश्न उपास्थित होते.