नाथाभाऊंच्या घरवापसीवर भाजपचे मुख्य प्रवक्तांचा मोठा खुलासा, म्हणाले..

जळगाव । राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसापासून भाजपात घरवापसी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. याच दरम्यान एकनाथ खडसे दिल्ली येथे गेल्याने या चर्चेला आणखी वेग आला. आता अशातच भाजपचे मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर मोठा खुलासा केला आहे. तसेच उन्मेष पाटील यांच्यावरही जहरी टीका केलीय.

काय म्हणाले अजित चव्हाण?
एकनाथ खडसे भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यासाठी ते दिल्ली मधील नेत्यांच्या गाठी भेटी घेत असल्याचा खुलासा भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण यांनी केला आहे. अजित चव्हाण हे आज जळगावात आले असून यादरम्यान त्यांनी भाजपच्या अभियान संदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.खडसेंना भाजपामध्ये येण्यासाठी भाजपा त्यांच्या घरी बोलवायला गेली नव्हती; मात्र त्यांच्याकडून भाजपामध्ये येण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यांना भाजपमध्ये घ्यावे किंवा न घ्यावे हा भाजपाच्या पक्षश्रेष्ठी यांचा निर्णय असणार आहे, जो निर्णय घेतला जाईल तो कार्यकर्त्यांना मान्य असेल असं अजित चव्हाण म्हणले.

दरम्यान, यावेळी त्यांनी नुकतेच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेल्या उन्मेष पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. एसटी स्टँड धुणारा, झाडू मारणाऱ्या कार्यकर्त्याला गिरीश महाजन यांनी उचलले. भाजपने त्यांना आमदार, खासदार केले. ते सोडून जात असतील तर लोकच त्यांना निवडणुकीत उत्तर देतील, असा निशाणा भाजप प्रवक्ते अजित चव्हाण यांनी उन्मेष पाटलांवर लगावला आहे.

आतापर्यंत गिरीश महाजन आणि भाजप यांचे झूल तुमच्या नाव पुढे होते. यामुळे तुम्ही निवडून येत होता. आता यापुढे बघू की तुम्ही काय करता. आपल्या वारसाला द्यावं तेवढं मंत्री गिरीश महाजन यांनी नाव दिलं. त्यांना ताकद दिली. त्यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी केले. आता तुम्ही जात आहात. आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. सोडून गेलेल्या लोकांना आपली पात्रता काय आहे कळेल, या शब्दांत अजित चव्हाण यांनी उन्मेष पाटील यांच्यासह करण पवार यांना थेट आव्हान दिले.