‘नादाला लागू नका, आम्ही मुंबई पण येऊ’, ठाण्यातील राड्यानंतर मनसे पुन्हा आक्रमक ?

ठाणे : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शेण आणि बांगड्या फेकल्याचा प्रकार नुकताच घडला. त्यामुळं ठाण्यात राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं दिसून आलं. आता यानंतर ठाणे मनसे नेते अविनाश जाधव यांनी मोठं विधान केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकून मारल्या होत्या. त्यानंत मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठरवून उद्धव ठाकरे ठाण्याकडे जात असताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात 16 ते 17 वाहनांवर नारळ फेकण्यात आले.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना नोटीसा देऊन सोडण्यात आल्यानंतर रात्री उशिरा नौपाडा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर पोलिसांनी सोडून दिलेल्या या महाराष्ट्र सैनिकांचा शोध पुन्हा सुरु केल्याची माहिती आहे. आता यानंतर ठाणे मनसे नेते अविनाश जाधव यांनी मोठं विधान केलं आहे.

काय म्हणाले अविनाश जाधव
राज ठाकरे यांच्या नादाला लागाल तर जशास तसे उत्तर देणार, जिथे जाल तिथे उत्तर देणार. केसेस घ्यायला आम्ही घाबरत नाही. माझी इच्छा होती चप्पल फेकून मारायची. आम्ही सकाळ पासून तयारीत होतो ते रात्री आले. उद्धव ठाकरे कधीही विसरणार नाही, असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

तुम्ही माझं एक ऑफिस पाडाल तर मी तुमचे चार ऑफिस फोडणार. माझ्या एका कार्यकर्त्याला मारले तर तुमच्या चार कार्यकर्त्याला मारणार, यांचे बॅनर आम्ही रात्रीच फाडले असते. मर्द असाल तर या समोर, मी उत्तर दिले आहे, असंही अविनाश जाधव म्हणाले.