मुंबई : महाविकास आघाडीमध्ये सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्याची चर्चा सुरु झाली आहे. त्याआधी तिन्ही पक्षांनी आपआपल्या परिने राजकीय तयारी सुरु केली आहे. येणार्या लोकसभा निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्रित सामोरे जातील, असा दावा केला जात असला तरी तिन्ही पक्षांमधील एकमेकांवरील राजकीय कुरघोड्यांमुळे त्याचा अंदाज आतातरी बांधणे कठीण आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना इशारा दिला आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी आपापल्या ताकदीची चाचपणी सुरु केली आहे. आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठराला नसला तरी आमचे १९ खासदार लोकसभेत राहतील, असा दावा राऊत यांनी केल्यानंतर आघाडीत पुन्हा बिघाडी निर्माण झाली आहे. यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आघाडीत अडचण निर्माण न करण्याचा सल्ला दिला आहे.
काय म्हणाले संजय राऊत
पवारांच्या घरी जी बैठक झाली ती एकत्र लढविण्याच्या चर्चेसाठी होती. कोणी काही म्हणूदेत आघाडी एकत्रच लढणार आहे. आमचे १९ खासदार लोकसभेत राहतील, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. मागीलवेळी लोकसभेला राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने जरी एक जागा जिंकली असेल तरी ती त्यांच्याकडेच राहिल. यामुळे जिंकल्यानंतर कोण कुठे गेला यावर जागावाटप ठरणार नाही. दादरा नगर हवेलीचा एक खासदार आमचा आहे, महाराष्ट्रात १८ जागा जिंकल्या होत्या. मी एवढेच सांगेन की लोकसभेत आमचे १९ खासदार असतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
नाना पटोले यांचा सल्ला
जागा लढण्यापेक्षा जागा कशा जिंकल्या जातील याची चर्चा व्हावी ही काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य करून महाविकास आघाडीच्या पुढच्या रणनीतीमध्ये अडचण निर्माण करू नये असा आमचा त्यांना सल्ला आहे, असे नाना पटोले यांनी राऊतांच्या विधानावर म्हटले. तसेच अद्याप असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, अशी चर्चा देखील झालेली नाही. आमच्या तिन्ही पक्षांकडून ३-३ लोक देऊन ९ लोकांची समिती केली जाईल आणि अंतिम निर्णय घेतला जाईल, असे पटोले यांनी स्पष्ट केले.