नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्ष पद जाणार?

मुंबई : राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्येही भाकरी फिरणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलानंतर आता लवकरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील हे मुंबई दौर्‍यावर येणार आहेत. त्याचवेळी पाटील प्रदेशाध्यक्ष पदासाठी चाचपणी करणार आहेत.

काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नुकतीच भाई जगताप यांची उचलबांगडी करून मुंबई अध्यक्षपदाची माळ आता वर्षा गायकवाड यांच्या गळ्यात पडली आहे. तर आता लवकरच प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. कारण गेल्या काही महिन्यापासून काँग्रेसमध्ये अस्वस्थता दिसुन येत आहे. विदर्भातील नेत्यानी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती.

नाना पटोले यांच्या कार्यशैलीवरून अनेक नेत्यांनी तक्रार केली होती. पहिल्यांदा बाळासाहेब थोरात त्यानंतर विदर्भातील काही नेते यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर दिल्लीमध्ये हायकंमाड, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना देखील अनेक नेते भेटले होते. याच पार्श्वभुमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील हे मुंबई दौर्‍यावर येणार आहेत. दोन दिवस ते मोठ्या नेत्यांना भेटणार आहेत. त्यामुळे पक्षाध्यक्ष बदलाच्या चर्चेला बळ मिळालं आहे.