“नाम बडे और दर्शन छोटे”, नगरदेवळा पशुवैद्यकीय केंद्राची परिस्थिती

पाचोरा : नगरदेवळा येथील पशुवैद्यकीय केंद्राची “नाम बडे और दर्शन छोटे” अशी अवस्था झाली आहे. कार्यरत कर्मचाऱ्याचे दुर्लक्ष, सततची गैरहजेरी. यामुळे हा दवाखाना बडा घर पोकळ वासा ठरला असून शेती व्यवसायाप्रमाणेच पशुपालन व्यवसाय करणे देखीलजिकिरीचे झाल्याने पशुपालक त्रस्त झाले आहे.

मुख्य रस्त्यांपासून अंतर्गत भागातील स्थानामुळे इतर व्यवसायांची फारसी संधी नसल्याने येथील शेतकरी शेती सोबतच उदरनिर्वाहासाठी मोठ्या संख्येने दुभती जनावरे पाळतात. शेतीसाठी आवश्यक असलेल्या पशूंची संख्याही येथे आहे. पावसाने दगा दिला, उत्पन्न घटले, भाव कोसळले तरी दूध विक्रीतून दर आठवड्याला येणाऱ्या थोड्याफार रोख रकमेतून येथील अनेक शेतकऱ्यांची चूल पेटत असते. साधारण पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळापासून येथे सोमवारच्या आठवडी बाजारासोबतच गुरांचा मोठा बाजारही भरतो. परंतु येथील जहागीरदार श्रीमंत स्व.बाळासाहेब पवार यांचा कालखंड वगळता व निवृत्त पशुवैद्यकीय कर्मचारी अरुण शामराव माळी यांच्या कार्यकाळात मिळत असलेल्या लसीकरण व औषधोपचाराच्या थोड्याफार सोयी सुविधा वगळता गेल्या अनेक वर्षांपासून या दवाखान्याने शेतकऱ्यांना व पशूंना चांगल्या शासकीय योजना,मार्गदर्शन किंवा वैद्यकीय सोयी सुविधा पुरविल्याचे शेतकऱ्यांना व पशुपालकांना फारसे आठवतच नाही. गेल्या वर्षभरापासून तर या दवाखान्यात डॉक्टरांचे क्वचितच दर्शन झाले आहे. एकमेव कर्मचारी असलेल्या शिपाईने वर्षभरात जेमतेम हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढ्या वेळेसच दवाखाना उघडला. दवाखाना सतत बंदच राहत असल्याने शेतकरी सहसा गुरांना सोबत आणायची हिंमत करतच नाहीत. या दवाखान्याच्या आवारात गुरांचे शेण सुद्धा कधी पडलेले दिसत नाही.

अनेकदा शेतकऱ्यांना येथील एकमेव कर्मचारी असलेल्या शिपाईच्या घरी जाऊन स्वतःच्या वाहनावर बसवून आणून दवाखान्यात आणावे लागते व थोडीफार औषधे मिळाली तर धन्यता मानावी लागते.सदर शिपाई कर्मचाऱ्याला आपल्या वाहनावर बसून शेतात गुरांपर्यंत घेऊन जावे लागते शिवाय घरी सुद्धा सोडावे लागते. तसेच व्हिजिट चार्जेस द्यावे लागतात व शासनाची औषधे वापरली तर त्याबद्दलही पैसे द्यावे लागतात.अनेकदा या कर्मचाऱ्याकडून लिहून दिलेली खाजगी मेडिकल वरची औषधेच वापरावी लागतात व ती टोचण्याबद्दल सुद्धा पैसे द्यावे लागतात.या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार रामभरोसे असल्याने पशूंवरील विविध आजार,साथीचे रोग,पशूंचे अपघात,तसेच पशूंवरील कुत्र्यांसारख्या प्राण्यांचे हल्ले अशा अनेक संकटांमध्ये खाजगी व्यवसायिकांवर अधिक अवलंबून रहावे लागते.येथील निष्काळजीपणा एवढा मोठा आहे की येथे राष्ट्रीय सणांच्या दिवशी ध्वजारोहण सुद्धा केले जात नाही.दुधाचे कमी भाव आणि चाऱ्याचे व पशुखाद्याचे वाढते भाव यातून कसरत करूनही पशुधन सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रात मोदींचे आणि राज्यात शिंदेंचे गोरक्षा करणारे सरकार असतानाही जर सरकारी दवाखान्यातून औषधे व सोयी सुविधा मिळत नसतील तर शेतकरी गोरक्षा व पशुसंवर्धन करतील तरी कसे असा सवाल नाराज शेतकरी व पशुपालकांकडून विचारला जात आहे.

शिपाईच डॉक्टर
येथील पशूवैद्यकीय कर्मचारी अरुण शामराव माळी हे वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर शासनाने ए आर महाजन या सेवानिवृत्त वैद्यकीय कर्मचाऱ्याला सहा महिने मानधनावर नेमले. त्यांचाही करार सहा महिन्यापासून संपलेला आहे. त्यानंतर दुसरे एक कर्मचारी काही कालावधी इथं मानधनावर कार्यरत होते. पूर्वी सफाई कामगार या पदावर कार्यरत असलेले व सध्या शिपाई म्हणून पदोन्नती मिळालेले अन्वर या नावाचे एकमेव कर्मचारी येथे कार्यरत असून पाचोरा येथील पशूधनविकास अधिकारी मॅडम यांच्याकडे येथील कार्यभार सोपविण्यात आला आहे. मात्र त्यांच्याकडे आधीच इतर दोन-तीन दवाखान्यांचा कार्यभार असून त्याही कधीही नगरदेवळा येथील दवाखान्यात आल्याचे किंवा त्यांनी शेतकऱ्यांशी काही संवाद साधल्याचे कुणाही शेतकऱ्यास दिसून आलेले नाही.

जुन्या दवाखान्यात अतिक्रमण
पशुवैद्यकीय दवाखाना नवीन मोठ्या इमारतीत स्थलांतरित झाल्यानंतर जुना दवाखाना व त्याच्या आवारात दोन खाजगी कुटुंबांनी अतिक्रमण केलेले असून हे दोन परिवार तेथे राहतात. त्यामुळे शासनाची ही स्थावर मालमत्ता खाजगी कब्जात जाण्याचा धोका संभवतो

झेंडावंदन नाही
समाजातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये देशप्रेम निर्माण होण्यासाठी प्रत्येकाला आपल्या खाजगी इमारतींवर सुद्धा ध्वजारोहण करता यावे, असे मोदी सरकारने ध्वज संहितेत सुधारणा करून सर्वसामान्यांना योग्य नियम पाळून आपल्या घरांवरसुद्धा झेंडावंदन करण्यास मुभा दिली आहे. मात्र येथील जुन्या पशुवैद्यकीय दवाखान्यात कधीही ध्वजारोहण झाले नाही. या वर्षी तर २६ जानेवारीला नवीन इमारतीचा दरवाजा सुद्धा उघडण्यात आलेला नाही.

लोकांची मनोगते

येथे गुरांचा दवाखाना नावापुरताच आहे. अनेकदा बंदच असतो. एक शिपाई असून तेही  फक्त खाजगी दवाखान्यातून विकत घेण्यासाठी औषधे लिहून देतात. खाजगी औषधे व सेवा घेणे खूप खर्चिक आहे. त्यामुळे पशुपालन अवघड झाले आहे.

– प्रवीण उदेसिंग राऊळ,शेतकरी व पशुपालक

आम्ही शेतकऱ्यांच्या अडचणी घेऊन अनेकदा या दवाखान्यात जातो. परंतु अनेकदा दवाखानाच बंद असतो. कधीतरी शिपाई दिसतो. तक्रार घ्यायला व सोयी सुविधा द्यायला येथे कोणीही अधिकारी नसतो. आमची कामे सोडून अडचणी सांगण्यासाठी तालुक्याला जाऊ शकत नाहीत.

– मयूर दिनेश मणियार, शहराध्यक्ष, शेतकरी संघटना