नाविन्यपूर्ण संशोधन करण्याची गरज : प्रा. उदय अन्नापुरे

जळगाव : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पदवीस्तरावर देखील संशोधनाला महत्व देण्यात आले असल्यामुळे विद्यार्थ्यांनी सातत्याने नाविन्यपूर्ण संशोधन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील इंडियन केमिकल टेक्नॉलॉजीच्या जालना येथील कॅम्पसचे संचालक प्रा. उदय अन्नापुरे यांनी केले.

            कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, व्य.प. परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांची उपस्थिती होती. मंचावर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, अविष्कारचे समन्वयक प्रा. जयदीप साळी, उपसमन्वयक डॉ. जितेंद्र नारखेडे उपस्थित होते.

प्रा. अन्नापुरे म्हणाले की, गरज ही शोधाची जननी आहे. कुतूहल अथवा उत्सुकता ही शोधासाठी प्रवृत्त करत असते. संशोधन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. त्याला शेवट नाही. संशोधनात अनेक आव्हाने आहेत. काहींचा अंदाज लावता येतो तर काहींचा अंदाज लावणे शक्य नाही. संशोधनात निराकारण केल्यानंतरही नवनवीन प्रश्न उभे राहत असतात. त्याच्या निराकरणासाठी जगळे जग एकत्र येवून काम करते. हे आपण कोवीडच्या काळात अनुभवले. माणूसकी हाच फक्त एक धर्म समजून लस शोधण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले. नवी पिढी अत्यंत गतीमान असून अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे आहेत. त्यांनी वेळेचे व्यवस्थापन करून अनुत्पादक वेळ वाया न घालवता संशोधनात गुंतवून घ्यावे याचा फायदा समाजाला  होईल असे आवाहन प्रा. अन्नापूरे यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी संशोधनात धैर्य, चिकाटी, आवड, हे गुण गरजेचे आहेत. कॉपी पेस्ट न करता नाविन्यपूर्णता आणा, नेहमीचा विचार न करता नवीन विचार करण्याची सवय लावा. आकलन, अवलोकन आणि विश्लेषण क्षमता वृध्दींगत करा, सोबतच गुणवत्तापूर्ण संशोधन करा अशा काही टिप्स प्रा. माहेश्वरी यांनी दिल्या. प्रारंभी प्रा. जयदीप साळी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. वीणा महाजन व प्रा. पुरूषोत्तम पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उपसमन्वयक डॉ. जितेंद्र नारखेडे यांनी आभार मानले. यावेळी जिल्हास्तरावर झालेल्या अविष्कार संशोधन स्पर्धेच्या संयोजक महाविद्यालयांचे प्राचार्य, समन्वयक व उपसमन्वयक यांचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ही संशोधन स्पर्धा दि. १३ डिसेंबरपर्यंत होणार असून ५६३ विद्यार्थ्यांच्या ३४७ प्रवेशिका या स्पर्धेत आहेत. पदवी, पदव्युत्तर आणि संशोधक या तीन गटांमध्ये  कृषी व पशुसंवर्धन, वाणिज्य, व्यवस्थापन व विधी, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, मानव्य विज्ञान, भाषा व ललितकला , वैद्यकीय व औषधीनिर्माण शास्त्र, विज्ञान या विषयातील मोड्युल व पोस्टर्स द्वारे विद्यार्थ्यांनी आपले संशोधन सादर केले. उद्या १३ डिसेंबर रोजी सायं. ४.३० वाजता कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण समारंभ होईल.