नाशिकच्या लोकसभेवरील जागे बाबत शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट

नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची बैठक होऊन चोवीस तास उलटत नाही तोच नाशिकमध्ये इंडिया आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी नाशिक लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने ऐन थंडीत नाशिकचे राजकारण तापले आहे.

शिवसेना ठाकरे गटाने पवारांची भेट घेऊन नाशिक लोकसभेवर दावा ठोकला असताना, पवारांनी अद्याप काही ठरले नसल्याचे सांगत ठाकरे गटाची हवा काढून घेतली. दुसरीकडे आंदोलनानंतर माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे बंधू गोकूळ पिंगळे आणि माजी आमदार नितीन भोसले यांच्या निवासस्थानी भेटी देऊन नाशिक लोकसभेवरील राष्ट्रवादीचा दावा कायम ठेवला आहे.

नाशिक जिल्ह्यात अडीच लोकसभा, तर १५ विधानसभा मतदारसंघ असले तरी सर्वच पक्षांच्या नजरा या नाशिक लोकसभेवर लागून आहेत. नाशिक लोकसभेत गेल्या वेळेस राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली होती. शिवसेनेचे हेमंत गोडसे शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे नाशिक लोकसभेवर ठाकरे गटाने दावा केला आहे. नाशिक लोकसभेसाठी ठाकरे गटाने तयारीही सुरू केली असून, विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीदेखील दावा सोडण्यास तयार नसल्यामुळे नाशिक लोकसभेवरून ठाकरे गट विरुद्ध शरद पवार गट असा सामना रंगला आहे. महायुती विरोधात इंडिया आघाडीची सध्या जागावाटपावरून दिल्लीत चर्चा सुरू आहे. त्यामुळे नाशिक दौऱ्यावर आलेल्या पवारांची ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल, लोकसभा सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, माजी गटनेते विलास शिंदे यांनी भेट घेत लोकसभेसाठी साकडे घातले. पवार यांनी प्रत्येकाची ख्यालखुशाली विचारत नाशिकमधील राजकीय परिस्थितीची माहिती घेतली. महायुतीशी लढाई करायची असेल, तर इंडिया आघाडीतील प्रत्येक पक्षाने एकमेकांशी समन्वय साधावा, अशी सूचनाही त्यांनी केली. तसेच, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकत्रित निर्णय घेण्याकडे भर द्यावा असेही सांगितले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ. डी. एल. कराड, तसेच महाविकास आघाडीच्या अन्य पक्षांच्या नेत्यांनीही पवार यांची भेट घेतली.

जागांबाबत अद्याप ठरले नाही

नाशिक लोकसभेची जागा ठाकरे गटाला द्यावी, अशी मागणी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी केली. परंतु, पदाधिकाऱ्यांचा हा दावा पवारांनी खोडून काढला. महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत १९ तारखेला दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत कोणती जागा कोणाला मिळणार याचा फॉर्म्युला ठरणार असल्याचे सांगत पवारांनी राष्ट्रवादीचा दावा कायम ठेवला आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचीही कोंडी झाली आहे.

पिंगळे-भोसलेंच्या भेटीगाठी

पवार यांनी आपल्या दौऱ्यात नाशिकची जागा पवार गटाकडे घेण्याचे सूतोवाच केल्यानंतर लोकसभेसाठी संभाव्य उमेदवारांचीही चाचपणी केली आहे. रविवारी रात्रीपासूनच त्यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर चांदवडच्या आंदोलनातून परतल्यानंतर पुन्हा नाशिकमधील नेत्यांच्या गाठीभेटी घेत चाचपणी केली. राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळेंनी अजित पवार गटाची वाट धरल्यानंतर शरद पवारांनी त्यांचे बंधू गोकूळ पिंगळे यांना पक्षात घेत त्यांना बळ देण्याचे काम सुरू केले आहे. पवार यांनी धावत्या दौऱ्यात गोकूळ पिंगळेंच्या घरी भेट देत त्यांच्याशी खासगीत चर्चा केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पवार यांनी माजी आमदार नितीन भोसले यांच्याही घरी जात चर्चा केली. त्यामुळे पवारांकडून लोकसभेसाठी उमेदवारांची चाचपणी केली जात असल्याचे चित्र आहे.