तरुण भारत लाईव्ह । २५ सप्टेंबर २०२३। शनिवारी ढगफुटी सारख्या पावसाने नागपूरमध्ये हाहाकार उडाल्यानंतर रविवारी पश्चिम विदर्भ,खान्देश, आणि मराठवाड्यातील काही भागात अतिवृष्टी झाली. प्रामुख्याने बुलढाणा, जळगाव, नाशिक, सह मराठवाड्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली. पावसासाठी आसुसलेल्या भागाला दिलासा मिळाला असला तरी अनेक भागात ढगफुटी सदृश्य पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणवाडी गाव पिंपळखुटा, धांडे, व माळेगाव, गौड़, या नांदुरा तालुक्यातील चार गावात शनिवारी रात्री मुसळधार पावसामुळे शेतशिवारांना तलावाचे स्वरूप आले. नदीवर नाल्याच्या काठावरील जमीन खरडून गेल्या. १२५ घरांची पडझड तर ७६ जनावरे वाहून गेली आहेत. या गावातील आणि परिसर जलमय झाला. मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातही दीर्घ खंडानंतर विविध भागात जोरदार पावसाने झोडपून काढले.
नागपूर पूरपरिस्थितीमुळे दहा हजार घरांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तर पार्किंग मधील ३८५ कार पाण्यात बुडाल्याने १०० कोटींचे नुकसान झाले. पुरामुळे पाच जणांचा मृत्यू झाला. नांदुरा जिल्ह्यात बुलढाणा येथे पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाला. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, या सहा जिल्ह्यातील ५० मंडळामध्ये अतीवृष्टीची नोंद झाली.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील 20 पैकी आठ मंडळात ढगडफुटीसदृश पाऊस झाला. विभागात अजूनही २४ टक्के पावसाची तूट कायम आहे. मात्र दोन दिवसातील पावसाने माना टाकणाऱ्या पिकांना दिलासा मिळाला आहे. बीड जिल्ह्यातील शेडमध्ये पाणी शिरल्याने तीन हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला. नाशिक मध्येही हलक्या सरींचा वर्षाव सुरू असून ग्रामीण भागात मात्र जोरदार पाऊस झाला. गंगापूर पाणलोट क्षेत्रातून धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. शनिवारी संध्याकाळपासून बंद केलेला विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आला. रविवारी दुपारपर्यंत ४.५४४ चा विसर्ग गोदावरीत करण्यात आला .यामुळे दुतोंड्या मारुतीची मूर्ती कमरेपर्यंत पाण्यात बुडाली.