नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या काही वर्षात ५० किलो वजन कमी केले आहे. गडकरी यांचे वजन १३५ किलोपर्यंत वाढले होते. आता ते ८५ किलो झाले आहे, नितीन गडकरींनी ५० किलो वजन कसं कमी केलं, याची उत्सूकता सर्वांनाच आहे. याबाबत खुद्द गडकरींनी त्यांच्या आहार व जीवनशैलीची सविस्तर माहिती एका मुलाखतीत दिली आहे.
आपल्या आरोग्याचे रहस्य सांगताना नितीन गडकरी म्हणाले की, मी २०११ पासून प्रयत्न करत आहे आणि १२ वर्षांत माझी संपूर्ण जीवनशैली बदलली आहे. ते म्हणाले की, माझ्या आयुष्यात पूर्वी कोणतेही वेळापत्रक नव्हते. तसेच मला जेवणात खूप रुची होती. पण आता फारसा आहार नाही आणि मी दोन्ही वेळी दोन चपाती खातो, थोडा भात, डाळ आणि भाजी खातो.
मी अन्नाचे प्रमाण नियंत्रित केले असून मला प्राणायामाचा खूप फायदा झाला आहे. माझ्या शरीरात इतका बदल झाला आहे याचा मला आनंद आहे. माझे संपूर्ण आयुष्यच अनियमित झाले होते तसेच खाण्यापिण्यात कोणती शिस्त नव्हती. पण आता त्यावर नियंत्रण आले आहे. मी दररोज दीड तास चालतो आणि प्राणायाम करतो, असे गडकरी यांनी सांगितले.